Join us

लाडक्या लेकीला १८ व्या वर्षापर्यंत मिळणार एक लाख! पाहा काय आहे 'ही' राज्य सरकारची स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 12:40 PM

मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'ही' योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलीना लखपती करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलीना लखपती करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढविणे, मुलीच्या शिक्षणास चालना देणे, शाळाबाह्य मुलीचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' ही योजना राबविण्यात येत आहे. 

अर्ज कोठे व कसा कराल? 

अंगणवाडी सेविकेकडे या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना खालच्या फोटोमध्ये दिसत असेल. याच फॉरमॅटमध्ये अर्ज करायचा आहे. योजनेसाठीच्या शासन निर्णयात हा फॉरमॅट देण्यात आला आहे. एका साध्या कागदावर लिहून तुम्ही हा अर्ज करू शकता, यात वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाइल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचे आहे, तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे. अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे. 

कागदपत्रे कोणती लागतात? 

लाभार्थीचा जन्माचा दाखला, युटुंबप्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.), लाभार्थीचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. 

ही आहे अट? 

आई किंवा वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. १ एप्रिल २०२३ पूर्वी १ मुलगी किया मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. 

ही योजना गरीब कुटुंबातील मुलीसाठी आहे. मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत मुलींना आर्थिक मदत देण्याच्या हेतूने योजना सुरू करण्यात आली आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ चीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रीतीने त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल, थेट लाभार्थी हस्तांतरणद्वारे लाभावी रक्कम लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे

टॅग्स :गुंतवणूकमहाराष्ट्रसरकार