Join us  

इनव्हेस्टमेंटचा बेस्ट ऑप्शन! बँक एफडीपेक्षाही चांगले रिटर्न देतायत 'या' सरकारी स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 5:02 PM

Best Investment Schemes: गुंतवणूक करुन याद्वारे तुम्ही चांगली कमाई करू शकता. पाहा कोणती आहे ही स्कीम.

Best Investment Schemes: देशात अशा अनेक सरकारी बचत योजना आहेत ज्या तुम्हाला बचतीसोबत पैसे कमवण्याची संधी देतात. जर बँकेच्या मुदत ठेवींमधील परतावा तुम्हाला कमी वाटत असेल, परंतु तुम्हाला त्यावर सुरक्षित परताव्याची हमी हवी असेल, तर तुमच्याकडे असे पर्याय देखील आहेत जे तुम्हाला खात्रीशीर परतावा देतील. बरेच लोक सुरक्षित गुंतवणूकीसाठी बँक एफडीचा पर्याय निवडतात. परंतु तुम्ही चांगल्या परताव्यासाठी इतर पर्याय निवडू शकता, जे तुम्हाला बँक एफडीपेक्षाही चांगले रिटर्न्स देतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या सरकारी योजना आहेत, म्हणून येथे तुम्हाला सुरक्षित आणि खात्रीशीर परतावे मिळतात. याशिवाय यासोबत तुम्हा टॅक्समध्ये सूटीचा लाभ दिला जातो.

पोस्ट ऑफिसच्या जबरदस्त स्कीमपोस्ट ऑफिसगुंतवणूकदारांना डिपॉझिटचे अनेक पर्याय ग्राहकांना देते. पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या अंतर्गत, पोस्ट ऑफिस अनेक योजना चालवते. यामध्ये उत्तम परतावा, कर सूट इत्यादी आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांचा समावेश आहे. या योजनांवरील व्याजदर दर तिमाहीत सुधारित केले जातात. पाहूया कोणत्या आहेत या स्कीम्स.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटनॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही एक छोटी बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला सध्या 7.7 टक्के व्याज दिलं जात आहे. तुम्ही यामध्ये 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता, कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. योजनेतील व्याजाचं कम्पाऊंडिंग वार्षिक आधारावर केलं जातं, परंतु ते केवळ मॅच्युरिटीवरच दिलं जातं. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, या योजनेत 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीला सूट देण्यात आली आहे.

सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना यात गुंतवणूक करता येऊ शकते. सध्या या योजनेवर ८.२ टक्के व्याज मिळत आहे. कलम 80C अंतर्गत, तुम्हाला 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा लाभ देखील मिळतो. त्यावर दर तीन महिन्यांनी सरकार तुम्हाला व्याज देते. साधारणपणे एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारीच्या पहिल्या दिवशी तुमच्या खात्यात व्याज जमा केलं जातं.

सुकन्या समृद्धी योजनामुलींच्या भविष्याचा विचार करता सरकारनं ही योजना सुरू केली आहे. या योजनेत गॅरंटीड रिटर्न मिळतात. या योजनेत 8 टक्क्यांप्रमाणे कंपाऊंडींग व्याजाचा लाभ मिळतो. हे वर्षाप्रमाणे मोजलं जातं. कोणताही भारतीय नागरिक त्याच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेत तुम्ही तुमच्या दोन मुलींसाठी खातं उघडू शकता. यामध्ये तुम्ही वार्षिक कमाल 1.50 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीमपोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो. जसा बँकांतील FD मध्ये निश्चित परतावा मिळतो, त्याचप्रमाणे तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये निश्चित परतावा मिळवू शकता. यामध्ये तुम्ही 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. वर्षांनुसार यावर वेगवेगळे व्याजदर आहेत. कमाल व्याज 7.5 टक्के आहे. व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते. हे व्याज दरवर्षी तुमच्या खात्यात जमा केलं जातं. तुम्हाला 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 80C अंतर्गत कर सूट देखील मिळते. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीवरही मर्यादा नाही.

टॅग्स :गुंतवणूकपोस्ट ऑफिस