Investment Tips: जर तुम्ही गुंतवणूक करण्याचं ठरवलं असेल तर तुम्ही थोडीफार कमाई करूनही गुंतवणुकीला सुरुवात करू शकता आणि कालांतरानं लाखो रुपयांचा निधी उभा करू शकता. अशाच काही योजनांवर एक नजर टाकूया ज्यात केवळ २५० रुपयांत गुंतवणूक सुरू करता येते आणि दीर्घ काळात लाखो रुपयांचा निधी उभा करू शकता. जे लोक दैनंदिन उत्पन्नावर अवलंबून आहेत किंवा महिन्याला जेमतेम काही हजार रुपये कमवू शकतात, ते देखील या योजनांमध्ये सहज पैसे गुंतवू शकतात. अशाच काही योजनांवर एक नजर टाकूयात.
सुकन्या समृद्धी योजना (SSY)
जर तुम्हाला तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी पैसे जोडायचे असतील तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. २५० रुपयांपासून तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता. यात १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते आणि ही योजना २१ वर्षांत मॅच्युअर होते. सध्या या योजनेवर ८.२ टक्के दरानं व्याज मिळत आहे. जर तुम्ही महिन्याला २५० रुपये गुंतवले तर तुम्ही एका वर्षात ३,००० रुपये आणि १५ वर्षात एकूण ४५,००० रुपयांची गुंतवणूक कराल. ८.२% दरानं तुम्हाला ९३,५५२ रुपये व्याज मिळेल आणि अशा प्रकारे तुम्ही महिन्याला फक्त २५० रुपये जमा करून मुलीसाठी १,३८,५५२ रुपयांची भर घालू शकता.
एसआयपी (SIP)
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एसआयपीमध्येही गुंतवणूक करू शकता. नुकतीच एसबीआयनं एक नवीन एसआयपी सुरू केली आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त २५० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. पब्लिक इन्व्हेस्टमेंट एसआयपी असं या योजनेचं नाव आहे. जर तुम्ही यात महिन्याला २५० रुपये जमा केले आणि ही गुंतवणूक २० वर्षे चालू ठेवली तर तुम्ही ६०,००० ची गुंतवणूक कराल. जर तुम्ही १२% रिटर्ननुसार हिशोब केला तर तुम्हाला १,८९,७८९ रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे तुम्ही एकूण २,४९,७८६ रुपये सहज जोडू शकता.
आरडी (RD)
रिकरिंग डिपॉझिट म्हणजे पिगी बँकेसारखे असते. ही योजना बँका आणि पोस्ट ऑफिस या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसमधील आरडी स्कीम ५ वर्षांसाठी आहे. या योजनेत केवळ १०० रुपयांत गुंतवणूक सुरू करता येते. सध्या त्यावर ६.७ टक्के दरानं व्याज मिळत आहे. जर तुम्ही महिन्याला २५० रुपये जमा केले तर तुम्ही ५ वर्षात एकूण १५,००० रुपयांची गुंतवणूक कराल आणि ६.७% व्याजासह २,८४१ रुपये कमवाल. अशा प्रकारे तुमचे १७,८४१ रुपये जमा होतील.
(टीप- यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)