आपण कोट्यधीश व्हावं असं अनेकांना वाटत असतं. हे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुंतवणूकही तितकीच महत्त्वाची असते. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त योग्य बचत आणि गुंतवणुकीचे धोरण (Savings and Investment Strategy) तयार करावे लागेल. आज आपण अशाच 555 च्या फॉर्म्युलाबद्दल (555 Formula can make you crorepati) जाणून घेऊ जो निवृत्तीच्या वयाच्या आधीच तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतो आणि तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकतो. याच्या मदतीने तुम्ही तुमचे कोट्यधीश होण्याचं स्वप्न तर पूर्ण करू शकताच, शिवाय रिटायरमेंटनंतरचा काळही उत्तम घालवू शकता.
काय आहे 555 फॉर्म्युला
करोडपती होण्याचा हा फॉर्म्युला वयाच्या 25 व्या वर्षापासून सुरू होतो. यामध्ये तुम्हाला 30 वर्षे सतत गुंतवणूक करावी लागेल आणि दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम 5 टक्क्यांनी वाढवावी लागेल. जेव्हा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात करता, तेव्हा तुम्ही दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम सतत 5 टक्क्यांनी वाढवता. जर तुम्ही हे 30 वर्षे सतत केले तर तुमचे वय 55 वर्षे होईल. 55 वर्षे सतत ५ टक्के दराने गुंतवणूक वाढवण्याच्या या धोरणाला 555 फॉर्म्युला म्हणतात. ही रणनीती अवलंबून तुम्हीही 30 वर्षांनंतर कोट्यवधींचे मालक होऊ शकता.
₹2000 पासूनही करू शकता सुरुवात
555 चा फॉर्म्युला वापरून तुम्ही ₹ 2000 पासूनही गुंतवणूक करायला सुरुवात केली तर वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही स्वतःला कोट्यधीश बनवू शकता. यासाठी तुम्हाला वयाच्या 25 व्या वर्षापासून SIP मध्ये गुंतवणूक करावी लागेल. एसआयपी ही एक अशी स्कीम आहे ज्याने अलीकडच्या काळात खूप चांगला परतावा दिला आहे. एसआयपीचा सरासरी परतावा 12 टक्के असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करता.
जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 2000 रुपयांनी एसआयपी सुरू केली आणि त्यात दरवर्षी 5 टक्क्यांची वाढ केली, तर 30 वर्षांत तुम्ही एकूण 15,94,532 रुपये गुंतवाल. परंतु तुम्हाला 12 टक्के दराने व्याजाच्या स्वरूपात 89,52,280 रुपये परतावा मिळेल. अशा प्रकारे वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही एकूण 1,05,46,812 रुपयांचे मालक व्हाल. जर तुम्ही या फॉर्म्युल्यासह 5000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही 2,63,67,030 रुपयांचे मालक व्हाल. तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार गुंतवणुकीची रक्कम निवडू शकता.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)