दरमहिन्याप्रमाणे १ मार्च २०२५ पासून नवे नियम बदलत आहेत. १ मार्चपासून म्हणजेच आजपासून ६ प्रमुख नियम बदलत आहेत. यामध्ये यूपीआय, म्युच्युअल फंडांपासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीपर्यंतचा समावेश आहे. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. जाणून घेऊयात कोणत्या नियमांमध्ये होणार बदल.
एलपीजी सिलिंडरच्या किंमती
आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आलीये. मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत आता पुन्हा १७५५.५० रुपये झाली आहे. फेब्रुवारीत ती १७४९.५० रुपये आणि जानेवारीत १७५६ रुपये होती. चेन्नईमध्येही याच्या किंमतीत वाढ झाली असून आता तो १९१८ रुपयांना मिळणार आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
ATF ची किंमत कमी
जेट इंधन किंवा विमान इंधनाच्या (एटीएफ) किंमतीत ०.२३ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत मार्च २०२५ साठी एटीएफची किंमत प्रति किलोलीटर २२२ रुपयांवरून ९५,३११.७२ रुपये प्रति किलोलीटर करण्यात आली आहे. यापूर्वी १ फेब्रुवारी रोजी त्यात ५.६ टक्क्यांनी दरवाढ करण्यात आली होती.
यूपीआय नियमात बदल
पुढील बदल विमा प्रीमियम पेमेंट सिस्टमशी संबंधित आहे. १ मार्च २०२५ पासून युनिफाइड पेमेंट इंटरफेसमध्ये (UPI) मध्ये बदल होणार आहे, ज्यामुळे विम्याचा हप्ता भरणं सोपं होईल. यूपीआय प्रणालीमध्ये इन्शुरन्स-एएसबी (अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाउंट) नावाचं नवं फीचर जोडले जात आहे. याद्वारे जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसीधारकांना त्यांच्या प्रीमियम भरण्याकरिता आगाऊ पैसे ब्लॉक करता येणार आहेत. पॉलिसीधारकाच्या मंजुरीनंतर खात्यातून आपोआप पैसे कापले जातील.
म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांमध्ये नॉमिनी जोडण्यासंदर्भातील नियम मार्चच्या पहिल्या महिन्यापासून बदलत आहेत. याअंतर्गत गुंतवणूकदार डिमॅट किंवा म्युच्युअल फंड फोलिओमध्ये जास्तीत जास्त १० नॉमिनी जोडू शकतो. यासंदर्भात बाजार नियामक सेबीनं मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जी १ मार्च २०२५ पासून लागू होतील. दावा न केलेल्या मालमत्तेची संख्या कमी करणे आणि गुंतवणुकीचे चांगले व्यवस्थापन सुनिश्चित करणे हा या बदलाचा उद्देश आहे.
पंजाब नॅशनल बँक
२ वर्षांहून अधिक काळ व्यवहार न केल्यास बँक खातं बंद केलं जाऊ शकतं. याबाबत बँकेनं आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी केलाय. बँक अशी खाती डी-अॅक्टिव्हेट करू शकते. जर तुम्हाला तुमचं बँक अकाऊंट अॅक्टिव्ह करायचं असेल तर त्यासाठी केवायसी करून घ्यावं लागेल.
१४ दिवस बँका राहणार बंद
आरबीआय बँकेच्या हॉलिडे लिस्टनुसार होळी (होळी २०२५) आणि ईद-उल-फितरसह इतर सणांच्या पार्श्वभूमीवर या महिन्यात १४ दिवस बँका बंद राहतील. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार साप्ताहिक सुट्टीचा समावेश आहे. मात्र, बँकेला सुट्टी असूनही तुम्ही ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैसे व्यवहार करू शकता किंवा बँकिंगची इतर कामे करू शकता. ही सेवा २४ तास सुरू राहणार आहे.