SIP Investment 70:20:10 Rule: भारतीय शेअर बाजारात सध्या मोठी तेजी दिसून येत आहे. परंतु, तरीही सुरक्षित गुंतवणूक आजही सर्वाधिक लोकप्रिय आहे. जरी इक्विटी मार्केटमध्ये परतावा जबरदस्त मिळत होता आणि मिळतही आहे, तरीही आता लोक म्युच्युअल फंडाकडे अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. यामध्येही, गुंतवणूकदार जोखमीच्या असेट्समध्ये पैसे गुंतवण्याऐवजी सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) गुंतवणूक करत आहेत. परंतु, जर तुम्हाला जलद गतीने नफा वाढवायचा असेल, तर तुम्हाला एक नियम पाळावा लागेल. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
कशी करावी गुंतवणूक?
फायनान्शिअल प्लानर्सच्या मते एसआयपी (SIP) गुंतवणूकदारांनी ७०:२०:१० चा नियम पाळला पाहिजे. यामुळे गुंतवणूक तर वाढेलच पण नफाही वाढेल. ७०:२०:१० च्या नियमाचा अर्थ असा आहे की ७० टक्के लार्जकॅपला, २० टक्के मिडकॅपला आणि १० टक्के स्मॉलकॅप फंडांना दिले पाहिजेत. लक्षात ठेवा, जर तुम्ही अद्याप अशा प्रकारे गुंतवणूक केली नसेल किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये संतुलन साधण्याची गरज असेल, तर तसा प्रयत्न करू शकता. हा गुंतवणुकीचा मूलभूत नियम आहे. यामुळे पोर्टफोलिओमध्ये कधीही अडचण येणार नाही.
तीन वर्षांत किती रिटर्न?
आकडेवारीनुसार, लार्जकॅप फंडांचा सरासरी ३ वर्षांचा एसआयपी रिटर्न २२ टक्के -२४.९५ टक्के आहे. तर, लार्ज आणि मिड कॅप फंडांसाठी सरासरी परतावा २५.३५ टक्के - २८.३३ टक्के आहे. मल्टीकॅप फंडांसाठी सरासरी परतावा २४.२६ टक्के - ३०.२२ टक्के, मिडकॅप फंडांसाठी सरासरी परतावा ३०.०६ टक्के-३५.२४ टक्के आणि स्मॉलकॅप फंडांसाठी सरासरी परतावा ३३.२७ टक्के - ३८.०९ टक्के होता.
कसा आणि केव्हा मिळतो फायदा?
फायनान्शिअल प्लॅनर्सच्या म्हणण्यानुसार एसआयपीसाठी काळ कायमच चांगला राहिला आहे. परंतु, अद्याप कोणीही एन्ट्री घेतली नसेल तर वेळ गेलेली नाही. बाजारात जी तेजी दिसून येत आहे, त्यामुळे आगामी काळात कन्सोलिडेशनची शक्यता अधिक आहे. छोट्या गुंतवणूकदारांनी आता आपली गुंतवणूक कायम ठेवावी. जेव्हा बाजार घसरतो तेव्हा एसआयपी गुंतवणूकदारांना संधी असते, तर जेव्हा बाजार वाढतो तेव्हा परताव्याची गती वाढते. जेव्हा बाजार घसरतो तेव्हा एसआयपीच्या किमती घसरल्यामुळे त्यांना स्कीमचे अधिक युनिट मिळू शकतात. त्याच वेळी, ७०:२०:१० चा नियम डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओच्या मदतीनं गुंतवणुकीत फायदा देतो.
किती काळासाठी गुंतवणूक करावी?
फायनान्शिअल प्लानर्सच्या मते, गुंतवणूकदारांनी इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये ८-१० वर्षांच्या कालावधीसाठी प्लान केला पाहिजे. गेल्या ३ वर्षांत, एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या सातत्यानं वाढत आहे. अनेक नवीन गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी एसआयपीदेखील करत आहेत. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये एसआयपीमधील योगदानाचा आकडा १ ट्रिलियनच्या पुढे गेला आहे. म्युच्युअल फंड कंपन्यांची संघटना असलेल्या AMFI च्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण एसआयपी खात्यांची संख्या ७.४४ कोटींवर पोहोचली आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)