दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ हा एक चांगला पर्याय आहे. १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यानंतर पीपीएफ खाते मॅच्युअर होते. फिक्स्ड इन्स्टूमेंटमध्ये PPF परतावा सर्वात आकर्षक आहे. परंतु, अनेकजण १५ वर्षांचा गुंतवणुकीचा कालावधी खूप मोठा मानतात. तथापि, योजनेच्या कालावधी दरम्यान पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे. याबद्दल आपण जाणून घेऊया.
PPF खाते १५ वर्षांनी मॅच्युअर होते. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम काढता येते. पीपीएफमध्ये मुदतपूर्तीपूर्वीच पैसे काढण्याची परवानगी आहे. तथापि, गुंतवणूकदार त्याच्या खात्यात जमा केलेल्या एकूण पैशांपैकी फक्त काही भाग काढू शकतो. खाते उघडण्याच्या सातव्या वर्षापासून आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे.
जर एखाद्या गुंतवणूकदाराला पीपीएफ खाते मुदतीपूर्वी बंद करायचे असेल तर त्यालाही परवानगी आहे. खाते उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षांनीच बंद केले जाऊ शकते. पीपीएफ खात्यातून आंशिक किंवा पूर्ण पैसे काढण्यासाठी फॉर्म सी वापरला जातो. हा फॉर्म ज्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमधून, ज्या ठिकाणाहून पीपीए खाते उघडले गेले आहे तिथून मिळू शकते.
विड्रॉव्हल फॉर्म आवश्यकफॉर्म C ला PPF विथड्रॉल फॉर्म असेही म्हणतात. बँकेच्या वेबसाइटवरूनही ते डाउनलोड करता येईल. या फॉर्मचे तीन भाग आहेत. पहिल्या भागात डिक्लेरेशन सेक्शन आहे. या विभागात, तुम्हाला तुमचा पीपीएफ खाते क्रमांक आणि तुम्हाला किती रक्कम काढायची आहे ते नमूद करावे लागेल. यामध्ये तुम्हाला हे देखील सांगावे लागेल की किती वर्षे खाते सक्रिय आहे.
फॉर्म C चा दुसरा भाग अधिकृत वापरासाठी आहे. त्यात तुमचे खाते उघडण्याची तारीख, खात्यात जमा केलेली एकूण रक्कम इत्यादींसह अनेक माहिती असते. तिसरा भाग रिसीटचा आहे. त्यावर सही करावी लागेल. फॉर्म सी पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला पीपीएफ पासबुक जोडावे लागेल. तुमच्या खात्यात जमा झालेले पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे पैसे डिमांड ड्राफ्टद्वारेही घेऊ शकता. बँकांनी अद्याप पीपीएफ खात्याशी संबंधित प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केलेली नाही. यासाठी गुंतवणूकदाराने ज्या शाखेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले त्या ठिकाणी जाणे आवश्यक आहे.