Berkshire Hathaway: वॉरेन बफे (Warren Buffett) यांची गणना जगातील महान गुंतवणूकदारांमध्ये केली जाते. बफे जगभरातील गुंतवणूकदारांसाठी प्रेरणा आहेत. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या अनेक गुंतवणुकींना मल्टीबॅगर बनवले आहे. दरम्यान, वॉरेन बफे दरवर्षी त्यांची कंपनी बर्कशायर हॅथवेच्या वार्षिक सभेला संबोधित करतात. आर्थिक जग या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहतात. या सभेत बफे कंपनीची भविष्यातील योजना, गुंतवणूक, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि अर्थव्यवस्था, अशा अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडतात. यावर्षी त्यांनी भारतात गुंतवणुकीचे संकेत दिले आहेत. वॉरन बफे म्हणाले की, भारतात प्रचंड संधी आहेत. मात्र, त्यांनी भारतातील गुंतवणुकीचा निर्णय कंपनीच्या पुढील व्यवस्थापनावर सोडला आहे.
भारतात संधी, पण आम्ही...बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरन बफेट यांनी भागधारकांना सांगितले की, आम्ही अद्याप भारतात प्रवेश केलेला नाही, पण तिथे अनेक संधी आहेत. पण, मला याबाबत कोणताही निर्णय घ्यायचा नाही. हे काम आमच्या पुढील व्यवस्थापनाला करावे लागेल. आम्हाला भारताबाबत स्पष्ट रणनीती बनवावी लागेल. बर्कशायर हॅथवे कोणत्या क्षेत्रात किती नफा कमवू शकतो, हे पाहावे लागेल. आम्ही तिथे गुंतवणूक करावी अशी भारताची इच्छा आहे, पण हे काम पुढील व्यवस्थापनाने केलेले बरे होईल.
जपानमधून चांगले रिटर्न्सते पुढे म्हणाले की, जपानमधील आमच्या गुंतवणुकीचे अतिशय चांगले परिणाम मिळत आहेत. भारतातही अशा अनेक संधी आहेत, मात्र तरुण व्यवस्थापन याबाबत अधिक चांगले निर्णय घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. वॉरन बफे यांच्या विधानावरुन हे स्पष्ट झाले आहे की, त्यांना बर्कशायर हॅथवेचे नियंत्रण लवकरच एका तरुण कार्यकारिणीकडे सोपवायचे आहे.
भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ आश्चर्यकारक राहिली आहे. जगात विविध समस्या असूनही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत जीडीपी वाढ 8.4 टक्के होती. यामुळेच टेस्ला आणि बर्कशायर हॅथवे सारख्या मोठ्या कंपन्या आता भारताकडे आशेने पाहत आहेत.