Join us  

Demat Account Rules: तुमच्याकडे एकापेक्षा अधिक डिमॅट खाती आहेत? ‘असा’ होईल फायदा अन् पाहा, ‘हे’ महत्त्वाचे नियम 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 10:01 AM

Demat Account Rules: बँक खात्याप्रमाणे एकापेक्षा जास्त डिमॅट खाती ठेवता येतात का? सेबीचे महत्त्वाचे नियम आणि फायदे जाणून घ्या...

Demat Account Rules: गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी एक म्हणजे शेअर मार्केट. शेअर बाजारातीलगुंतवणूक अतिशय जोखमीची मानली जाते. काही कंपन्या गुंतवणूकदारांना निराश न करता अनपेक्षित परतावा देतात. तर काही कंपन्या गुंतवणूकदारांना रडकुंडीला आणतात. असे असले तरी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीकडे अधिक कल असल्याचे पाहायला मिळते. मात्र, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते (Demat Account Rules) असणे आवश्यक असते. काही जणांकडे एकापेक्षा जास्त डिमॅट खाती असू शकतात. तुमच्याकडे एकापेक्षा अधिक डिमॅट खाते असेल, तर सेबीचे महत्त्वाचे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी आवश्यक ठरू शकते.

डिमॅट खाते म्हणजे डिमॅटेरियलायझेशन खाते होय. जे बँक खात्यासारखेच असते. यामध्ये शेअर्स, बाँड्स, सरकारी सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड, विमा आणि ईटीएफ यामधील गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ होते. डिमॅट खाते तुमची गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवते. डिमॅट खात्याचा एक्सेस मिळवण्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड असणे आवश्यक आहे. बँक खात्याप्रमाणे एकापेक्षा जास्त डिमॅट खाती ठेवता येतात का? तर उत्तर होय आहे. परंतु एकाच डिपॉझिटरी किंवा बँकेत एकापेक्षा जास्त खाते उघडता येत नाही. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून अशी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत, ज्यात असे म्हटले आहे की, गुंतवणूकदार एकापेक्षा जास्त डिमॅट खाते ठेवू शकत नाहीत. फक्त तुमच्या खात्याशी पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. पण एकापेक्षा जास्त डिमॅट खाते असण्याचे फायदे आणि तोटे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

कसे उघडता येते डिमॅट खाते?

डिमॅट खाते ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने उघडता येते. ऑनलाइन खाते उघडण्यासाठी प्रथम तुम्हाला तुमच्या पसंतीच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. डिमॅट खात्यासाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला काही प्रमुख कागदपत्रे सादर करणे आणि तुमचे केव्हायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी ओळखीचा पुरावा, पत्ता पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, पॅन कार्ड, रद्द केलेला धनादेश आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अशी कागदपत्रे आवश्यक असतात. केव्हायसी पूर्ण केल्यावर तुमचे खाते उघडण्यापूर्वी तुमच्या विनंतीवर प्रक्रिया आणि पडताळणी केली जाईल, त्यानंतर तुमचे खाते उघडले जाईल.

एकापेक्षा अधिक डिमॅट खाते असण्याचे फायदे काय?

एकापेक्षा जास्त डिमॅट खाते असण्याचे कोणतेही विशेष फायदे नाहीत. याउलट हे तुमच्यासाठी एक प्रकारे डोकेदुखी ठरू शकते. यामध्ये विविध ब्रोकरेज हाऊसच्या विविध सुविधांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही तुमची दोन खाती वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीसाठी वापरू शकता. एक खाते दीर्घकालीन व्यवहारांसाठी आणि दुसरे अल्पकालीन व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकते. यामुळे शेअर्सच्या विक्रीत कोणताही गोंधळ होणार नाही. एकाधिक खात्यांसह, तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ वाढवू शकता. 

डिमॅट खात्यांचा देखभाल खर्च वाढतो

एकापेक्षा जास्त डिमॅट खात्यांचा देखभाल खर्च वाढतो. प्रत्येक वेळी तुम्ही व्यापार करता तेव्हा हस्तांतरण शुल्क आकारले जाते. तुमची एकापेक्षा जास्त खाती असतील तर तुम्हाला त्यात बराच वेळ घालवावा लागेल. पगारदार व्यक्ती असाल आणि सक्रिय गुंतवणूकदारही नसाल, तर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त डिमॅट खाते नसावे, असे सांगितले जाते. एकापेक्षा जास्त डिमॅट खात्यांच्या बाबतीत, सर्व डिमॅट खात्यांचा मागोवा ठेवणे आवश्यक आहे. कारण बऱ्याच काळापासून कोणत्याही एका डिमॅट खात्यात लॉग इन केले नसेल, तर तुमचे खाते देखील गोठवले जाऊ शकते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :शेअर बाजारबँकिंग क्षेत्रगुंतवणूक