- चंद्रकांत दडस, उपसंपादक
जर तुमच्या बचत खात्यात अधिक पैसे असतील आणि आपल्याला त्यावर अधिक व्याज मिळत नसेल तर अशा स्थितीत ऑटो स्विप सुविधा वापरावी. ऑटो स्विप सुविधा नेमके काय ते जाणून घेऊ....
ऑटो स्विप नेमके काय?
ही सुविधा प्रत्येक बँकेत उपलब्ध आहे. जर एखाद्या बचत खातेधारकाने त्याच्या बचत खात्यात ऑटो स्विप सुविधा सुरू केली, तर एफडीची सुविधा म्हणजेच मुदत ठेवदेखील त्याच्या खात्यातून आपोआप सुरू होते. जेव्हा खात्यात जास्त पैसे असतात, तेव्हा ते पैसे ग्राहकाच्या नावावर आपोआप ते एफडीमध्ये रूपांतरित होतात. त्यावर जास्त व्याज मिळते. यामध्ये बचत मर्यादा किती असावी, हे ग्राहक ठरवतात. एफडी झाल्याची माहिती ग्राहकाच्या मोबाईलवर येते. जर कधी खात्यातील पैसे ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असतील तर पैसे आपोआप एफडीमधून बचत खात्यात परत येतात. अशा प्रकारे ग्राहकाला एकाच खात्यावर बचत खाते आणि एफडी दोन्हीचा लाभ मिळतो.
ऑटो स्विपचे फायदे
सर्वसाधारणपणे, सध्या बचत खात्यावर केवळ ३-४ टक्के वार्षिक व्याज मिळते. एफडीवर ६-८ टक्के व्याज मिळते. अशा परिस्थितीत, ऑटो स्विप सुविधा घेतल्यास बचतीच्या पैशांतून तुम्हाला एफडीद्वारे चांगला परतावा मिळू शकतो. जेव्हा तुम्ही एफडी कराल तेव्हा त्यात ठरावीक कालावधीसाठी व्याज जमा करावे लागते. एफडी मध्येच बंद केली तर नुकसान होते. पण बचत खात्यात ही एफडी जोडल्यामुळे तुम्ही अशा कोणत्याही बंधनात राहत नाही. तुमचे पैसे साधारणपणे, कधीही कोणत्याही प्रक्रियेशिवाय काढता येतो.
ही सुविधा कशी सुरू कराल?
ऑटो-स्विप सुविधेला बँक खात्याशी जोडण्यासाठी आपल्याला आपल्या बचत खात्याला एफडी खात्याशी लिंक करावे लागेल. यात तुम्हाला स्वतः फंडाची मर्यादा निश्चित करावी लागेल. यात तुम्हाला बँकेला सांगावे लागेल की, खात्यात किती रक्कम ठेवायची आणि उरलेले पैसे एफडी खात्यात हस्तांतरित केले जावेत. ही सुविधा ऑनलाइन किंवा बँकेला भेट देऊन सुरू करता येते.