Join us

काय असते कॉर्पोरेट एफडी, सामान्य बँक एफडी पेक्षा किती आहे निराळी? पाहा फायदे-नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 10:08 AM

गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असूनही, फिक्स्ड डिपॉझिट हा अजूनही लोकांचा आवडता पर्याय आहे. कारण त्यात लोकांना हमी परतावा मिळतो आणि त्यांचे पैसे देखील सुरक्षित राहतात.

Corporate FD: गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असूनही, फिक्स्ड डिपॉझिट हा अजूनही लोकांचा आवडता पर्याय आहे. कारण त्यात लोकांना हमी परतावा मिळतो आणि त्यांचे पैसे देखील सुरक्षित राहतात. जर तुम्ही देखील अशा गुंतवणूकदारांपैकी असाल तर तुम्हाला कॉर्पोरेट एफडी बद्दल जाणून घेणं आवश्यक आहे. कॉर्पोरेट एफडीचा फायदा असा आहे की तुम्हाला त्यात बँक एफडीच्या तुलनेत जास्त नफा मिळू शकतो. कॉर्पोरेट एफडी म्हणजे काय आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत ते जाणून घेऊ. 

कॉर्पोरेट FD वर जास्त व्याज  

बँक एफडी बँकांद्वारे जारी केली जाते, परंतु कॉर्पोरेट एफडी अनेक कंपन्यांद्वारे जारी केल्या जातात. कॉर्पोरेट एफडीच्या माध्यमातून कंपन्या लोकांकडून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निधी गोळा करतात. ही एफडी देखील बँकेच्या एफडी प्रमाणेच काम करते. यासाठी कंपनी ठराविक कालावधीसाठी गुंतवणूकदारांकडून पैसे घेते आणि ग्राहकांना व्याजासह रक्कम परत करते. लोकांना आकर्षित करण्यासाठी, कॉर्पोरेट एफडीमध्ये बँक एफडीपेक्षा चांगलं व्याज दिलं जातं. 

वेगवेगळ्या कालावधीची एफडी   

साधारणपणे कॉर्पोरेट एफडीचा मॅच्युरिटी कालावधी १ ते ५ वर्षांपर्यंत असतो. बँकांप्रमाणे, वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजदर भिन्न असू शकतात. ज्याप्रमाणे बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अतिरिक्त व्याज देतात, त्याचप्रमाणे सर्व कॉर्पोरेट एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सामान्य एफडीच्या तुलनेत अतिरिक्त व्याज दिलं जातं. 

तोटे काय? 

साधारणपणे, बँक एफडी हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो कारण त्यात रिझर्व्ह बँकेचे कठोर नियम पाळले जातात. परंतु कॉर्पोरेट एफडी मधील जोखीम बँक एफडी पेक्षा किंचित जास्त आहे. बँक कोसळल्यास, जमा केलेल्या रकमेवर डीआयसीजीसी अंतर्गत विमा लाभ उपलब्ध आहे, परंतु कॉर्पोरेट एफडीवर असा कोणताही विमा नाही. कंपनी बुडली तर तुमचे पैसेही बुडू शकतात. दरम्यान, जर तुम्ही चांगल्या रेटेड कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले तर जोखीम खूपच कमी असू शकते. कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीचा १०-२० वर्षांचा रेकॉर्ड तपासणं आवश्यक आहे. 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा