सरकारनं 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीमध्ये (PF) जमा केलेल्या रकमेवरील व्याज वाढवून 8.15 टक्के केलं आहे. तेव्हापासून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य त्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची वाट पाहत आहेत. या संदर्भात एका सदस्यानं ट्वीट करून ईपीएफओला यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. यावर ईपीएफओनं उत्तर देत सदस्याला व्याज जमा कधी केलं जाईल यासंदर्भात अपडेट दिली.
2022-23 या आर्थिक वर्षासाठी खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पाइपलाइनमध्ये आहे. ते लवकरच जमा होईल. व्याजाचं नुकसान होणार नाही, असं उत्तर यावर ईपीएफओकडून देण्यात आलं. ईपीएफओ खात्यातील व्याज केवळ मासिक आधारावर मोजलं जातं. परंतु ते आर्थिक वर्षाच्या अखेरीस सदस्यांच्या खात्यात जमा केलं जातं.
व्याजदर वाढवले
कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) आर्थिक वर्ष 2022-23 करिता ईपीएफ खात्यांसाठी 8.15 टक्के व्याजदराची घोषणा केली आहे. यापूर्वी हा व्याजदर 8.10 टक्के होता.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून जारी करण्यात आलेल्या सर्क्युलरनुसार, याच वर्षाच्या मार्च महिन्यात बोर्डानं व्याजदर 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्के करण्यात यावा, असा प्रस्ताव दिला होता. यानुसार, सीबीटीच्या शिफारशीनंतर अर्थमंत्रालयाकडून व्याजदर नोटिफाय केला जातो. यानंतर तो ईपीएफओ सदस्यांच्या खात्यांत जमा केला जाऊ शकतो.