Join us

बिटकॉइन घेईल सोन्याची जागा? कशात गुंतवणूक करणे फायदेशीर? कुठे मिळेल चांगला परतावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:47 IST

bitcoin vs gold : बिटकॉईनला सोन्याचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. पण, प्रत्यक्षात बिटकॉईन सोन्याची जागा घेईल का? तज्ज्ञांना काय वाटतं?

Gold investment : काळाप्रमाणे गुंतवणुकीची साधनं बदलत गेली. सध्या बाजारात असंख्य गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. काळाच्या ओघात अनेक पर्याय कायमचे बंद झाले तर अनेक नव्याने निर्माणही झाले. मात्र, यात असा एक पर्याय आहे, जो आजही दिमाखात उभा आहे. राजे महाराजांच्या काळापासून आजच्या काळातील धनिकांपर्यंत सोने नेहमीच समृद्धी आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे. आजच्या आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी आणखी वाढली आहे. तर दुसरीकडे नव्या युगातील बिटकॉईन जगभर लोकप्रिय होत आहे. बिटकॉईनमधील गुंतवणूकही झपाट्याने वाढत आहे. भविष्यात बिटकॉईन सोन्याची जागा घेईल असंही बोललं जात आहे. खरच हे शक्य होईल का? चला जाणून घेऊ.

सोने सुरक्षित गुंतवणूक पर्याय

मनीकंट्रोलच्या ग्लोबल वेल्थ समिट २०२५ मध्ये डेव्हिड टेट यांनी सांगितले की, सोने हा एक मजबूत गुंतवणूक पर्याय राहील. यामुळेच जगभरातील केंद्रीय बँकाही याला सुरक्षित मालमत्ता मानतात. या वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किमती १२ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत आणि सतत नवीन विक्रम निर्माण करत आहेत.

जागतिक कर्ज आणि महागाई दरम्यान सोन्याचे महत्त्व

टेट यांच्या मते, जगभरातील सरकारांवर सुमारे ७६ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे, जे आणखी १३ ट्रिलियन डॉलरपर्यंतपर्यंत वाढू शकते. वाढत्या महागाई आणि दरवाढीमुळे हे कर्ज आणखी वाढणार आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना स्थिरता आणि सुरक्षा प्रदान करणारी एकमेव मालमत्ता सोने आहे. भविष्यात सोन्याचे भाव आणखी वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आशियाई देशांमध्ये सोन्याची मागणी वाढली

भारत, चीन आणि जपानसारख्या देशांमध्ये सोन्याची मागणी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या सोन्याचा साठा वाढवायला सुरुवात केली आहे. जपानमध्ये, जुनी पिढी आपली संपत्ती नवीन पिढीकडे सोपवत आहे, जी गुंतवणुकीबाबत अधिक जागरूक आहे, ज्यामुळे सोन्यात गुंतवणूक वाढू शकते. चीनमधील विमा कंपन्यांना आता सोन्यात गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाली आहे. सध्या ही गुंतवणूक एकूण मालमत्तेच्या केवळ १ टक्के आहे. परंतु, चीनच्या विमा बाजाराची किंमत ४.८ ट्रिलियन डॉलर आहे. जर ही गुंतवणूक ५ टक्क्यांपर्यंत पोहोचली तर सोन्याच्या किमती १०-१५ टक्क्यांनी वाढू शकतात.

बिटकॉइन विरुद्ध सोने

अमेरिकेतील फोर्ट नॉक्समध्ये ठेवलेल्या सोन्याबाबत नुकताच वाद झाला होता. १९५३ पासून येथे ठेवलेल्या सोन्याची पूर्ण तपासणी झालेली नाही. यावर टेट म्हणतात की फोर्ट नॉक्समधील सोने पूर्णपणे सुरक्षित असून यात शंका घेण्याची गरज नाही. बिटकॉइनकडे सोन्याचा पर्याय म्हणून अनेकदा पाहिले जाते. पण, बिटकॉईन हे एक सट्टा साधन आहे, तर सोने ही स्थिर आणि विश्वासार्ह गुंतवणूक आहे, असल्याचे मत टेट यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :सोनंबिटकॉइनगुंतवणूक