Mutual Fund Investment Tips : जेव्हा जेव्हा दमदार परताव्याचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो तो म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा. परंतु, शेअर बाजारात जोखीमही तितकीच मोठी असते. अशावेळी तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवू शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल. एसआयपीची सुविधा प्रत्येक म्युच्युअल फंडात उपलब्ध असते, ज्यामुळे गुंतवणूक करणं अधिक सोपं होतं. १५*१५*१५ फॉर्म्युल्याचा अवलंब करून तुम्ही कोट्यधीश बनू शकता. तर वयाच्या ४५ व्या वर्षापर्यंतच तुम्ही निवृत्त होऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला दरमहा ५० हजार रुपये पेन्शन मिळू शकतं. ते कसं काम करतं ते जाणून घेऊया.
काय आहे १५*१५*१५ फॉर्म्युला?
१५*१५*१५ फॉर्म्युला म्हणजे १५ वर्षांसाठी दरमहा १५,००० रुपये १५ टक्के दराने गुंतवा. १५ टक्के दराची हमी कोणीही देणार नाही, पण म्युच्युअल फंडात दीर्घ मुदतीत सरासरी १५ टक्के दर मिळू शकतो, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असं केल्यास तुम्ही १५ वर्षात एक कोटी रुपयांचा निधी जमा करू शकता, म्हणजेच तुम्ही कोट्यधीश बनू शकता. हे सर्व कंपाउंडिंगमुळे शक्य होतं.
पॉवर ऑफ कंपाउंडिंग म्हणजे काय?
पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे आपल्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळणं. याअंतर्गत तुम्हाला मुद्दलावर व्याज मिळतं, पुढील महिन्यांत मुद्दलावर मिळणाऱ्या व्याजावरही व्याज मिळतं. उदाहरणार्थ, सध्याची परिस्थिती पाहिली तर समजा तुम्ही जानेवारी महिन्यात १५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. यावर तुम्हाला १५ टक्के दरानं जवळपास १८७ रुपयांचं व्याज मिळेल. पुढच्या महिन्यात तुम्ही पुन्हा १५ हजार रुपये जमा कराल, त्यामुळे आता तुमची एकूण गुंतवणूक ३० हजार होईल, पण तुम्हाला ३०,१८७ रुपयांवर व्याज मिळेल, म्हणजेच व्याजावरही व्याज मिळेल. ही कंपाउंडिंगची ताकद आहे.
किती होईल फायदा, समजून घ्या हिशेब
समजा तुम्ही दरमहिन्याला १५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. अशा तऱ्हेनं तुम्ही १५ वर्षात जवळपास २७ लाख रुपयांची गुंतवणूक कराल. जर तुम्हाला या पैशावर १५ वर्षात सरासरी १५% व्याज मिळालं तर तुम्हाला ७३ लाख रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच तुमच्या फंडाचा कॉर्पस एकूण १,००,२७,६०१ रुपये असेल. अशा प्रकारे तुमची गुंतवणूक १ कोटी रुपयांपेक्षा अधिक होईल.
४५ व्या वर्षी निवृत्ती, ५० हजार पेन्शन
जर तुमचं वय ३० वर्षे असेल आणि तुम्ही तेव्हापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्ही वयाच्या ४५ व्या वर्षी कोट्यधीश बनू शकता. जर तुमच्याकडे १ कोटी रुपये असतील तर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करू शकता, ज्यावर तुम्हाला ६-७% व्याज आरामात मिळेल. जर तुम्हाला फक्त ६% व्याज मिळालं तर तुम्हाला वार्षिक ६ लाख रुपये मिळतील, म्हणजेच तुम्हाला दरमहा ५० हजार रुपये पेन्शन मिळू शकतं.