नवी दिल्ली : गुरुवारचा दिवस जगातील श्रीमंतांसाठी वाईट ठरला. वॉरन बफे आणि मुकेश अंबानी वगळता इतर सर्व श्रीमंतांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. या सर्वांनी मिळून एका झटक्यात 43 अब्ज डॉलर्स म्हणजेच 35,27,13,95,00,000 रुपये गमावले. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागेल.
इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीत $20.3 अब्जची घट झाली आहे. तर, जेफ बेझोस यांना $5.32 बिलियन आणि मार्क झुकरबर्गला $4.70 बिलियनचा फटका बसला. यादरम्यान, वॉरेन बफेंच्या संपत्तीत $1.25 अब्ज तर भारतीय उद्योगपती मुकेश अंबानींच्या संपत्तीत $1.19 अब्जने वाढ झाली. टॉप 15 अब्जाधीशांपैकी फक्त तीन श्रीमंतांची संपत्ती गुरुवारी वाढली.
इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या टेस्ला कंपनीचे शेअर्स गुरुवारी 9.74 टक्क्यांनी घसरले. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, सध्या मस्क $234 अब्ज संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या यादीत फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुरुवारी त्यांची एकूण संपत्ती $1.57 बिलियनने घसरुन $201 बिलियनवर आली. बेझोस या यादीत 155 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या, बिल गेट्स ($ 138 अब्ज) चौथ्या आणि लॅरी एलिसन ($ 131 अब्ज) पाचव्या क्रमांकावर आहेत.
अंबानी-अदानींच्या संपत्तीत वाढ
अमेरिकेचे स्टीव्ह बाल्मर 120 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. गुरुवारी त्यांनी $2.60 अब्ज गमावले. बफेट 116 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सातव्या, झुकेरबर्ग ($110 अब्ज) आठव्या, लॅरी पेज ($109 अब्ज) नवव्या आणि सेर्गे ब्रिन ($104 अब्ज) 10व्या क्रमांकावर आहेत. भारत आणि आशियातील सर्वात मोठे अब्जाधीश मुकेश अंबानी $ 99.5 बिलियनसह या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी 60.9 अब्ज डॉलरसह 22 व्या क्रमांकावर आहेत. गुरुवारी त्यांची एकूण संपत्ती $80.9 मिलियनने वाढली.