How to Open PPF account Online: जर तुम्हाला सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर पीपीएफ (Public Provident Fund) हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पीपीएफचा फायदा म्हणजे तुम्ही घरबसल्या ते ऑनलाइन उघडू शकता. आपण पीपीएफ खातं सहज कसं उघडू शकता, त्यासाठी कोण पात्र आहे आणि त्यावर किती व्याज मिळतं हे जाणून घेऊया.
१. पीपीएफ अकाऊंट काय आहे?
पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) ही सरकारी बचत योजना आहे, त्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमची बचत सुरक्षित ठेवू शकता आणि चांगलं व्याजही मिळवू शकता. याचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम दोन्ही करमुक्त असतात. या योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी १५ वर्षांचा आहे, जो आपण वाढवू शकता.
२. पीपीएफ खाते कोण उघडू शकते? (पात्रता)
कोणताही भारतीय नागरिक, मग तो प्रौढ असो किंवा अल्पवयीन असो, पीपीएफ खाते उघडू शकतो. अल्पवयीन मुलासाठी त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक खातं उघडू शकतात.
अनिवासी भारतीय: एनआरआयसाठी (अनिवासी भारतीय) पीपीएफ खातं उघडण्यास परवानगी नाही. जर त्यांनी आधी खातं उघडले असेल तर ते चालू ठेवू शकतात, परंतु नवीन खातं उघडू शकत नाहीत.
३. पीपीएफ खात्यात गुंतवणूक कशी करावी?
पीपीएफ खात्यात एका वर्षात तुम्ही कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. ही रक्कम एकाच वेळी किंवा अनेक हप्त्यांमध्ये जमा करता येते. जर तुम्ही वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करत असाल तर ते करसवलतीच्या (८० सी) कक्षेत येतं, ज्यामुळे तुम्हाला इन्कम टॅक्स वाचवता येतो.
४. पीपीएफ खात्यावर किती व्याज मिळतं?
पीपीएफवरील व्याजदर सरकारकडून दर तिमाहीला निश्चित केलं जातं. सध्या (२०२४-२५) पीपीएफवर वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळतं. या व्याजाची खासियत म्हणजे ते करमुक्त आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ मिळतो.
५. घरबसल्या पीपीएफ खातं कसे उघडावं?
जर तुमचे बँक खाते एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय किंवा बँक ऑफ बडोदा सारख्या मोठ्या सरकारी किंवा खाजगी बँकेत असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पीपीएफ खाते उघडू शकता. जाणून घेऊ प्रक्रिया.
- तुम्ही तुमचं नेटबँकिंग लॉग इन करा.
- त्यानंतर सर्व्हिसेस सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही पीपीएफ अकाऊंट ओपन करण्याचा पर्याय निवडा.
- आवश्यक माहिती भरा. याठिकाणी तुम्हाला वैयक्तिक माहिती आणि नॉमिनीची माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्डासारखी कागदपत्रे अपलोड करा.
- आपलं खातं ओपन करण्यासाठी किमान ५०० रुपये जमा करा.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळेल. त्यानंतर तुमचं पीपीएफ अकाऊंट ओपन होईल.