Join us  

Investment Tips : धनत्रयोदशीपासून 'या' ठिकाणी करा गुंतवणूकीचा 'श्रीगणेशा', ₹३००० पासूनही सुरूवात केली तरी होईल धनवर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 10:57 AM

Diwali Investment : धनत्रयोदशीचा दिवस गुंतवणुकीच्या दृष्टीनं अत्यंत शुभ मानला जातो. जर तुम्हाला या दिवशी खूप महागडी वस्तू खरेदी करायची नसेल तर तुम्ही या दिवशी छोट्या रकमेसह गुंतवणुकीचा 'श्रीगणेशा' करू शकता. 

Diwali Investment : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. धनत्रयोदशीचा दिवस गुंतवणुकीच्या दृष्टीनं अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी लोक सोने-चांदी वगैरे खरेदी करून घरी आणतात. अनेक जण जमीन आणि घरे वगैरेही या दिवशी विकत घेतात. पण जर तुम्हाला या दिवशी खूप महागडी वस्तू खरेदी करायची नसेल तर एसआयपी (SIP) म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणुकीचा 'श्रीगणेशा' करू शकता. 

गेल्या काही काळापासून एसआयपीमधील गुंतवणूक झपाट्यानं वाढली आहे. दीर्घ मुदतीसाठी मोठा फंड तयार करण्यासाठी ही योजना अत्यंत चांगली आहे. जर तुम्ही ३,००० रुपयांपासूनही यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर येणाऱ्या काळात तुमच्यावर मोठ्या प्रमाणात धनवर्षाव होऊ शकतो.

होऊ शकता कोट्यधीश?

जर तुम्ही दररोज १०० रुपयांची बचत केली तर महिन्याला तुम्ही ३,००० रुपये जमवू शकता. जर तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा ३००० रुपये गुंतवत असाल तर ही गुंतवणूक पुढील २०, २५ ते ३० वर्ष सुरू ठेवा. मार्केट लिंक्ड स्कीम असल्यानं यात गॅरंटीड परतावा मिळत नसला तरी एसआयपीचा सरासरी परतावा १२ टक्क्यांच्या आसपास मानला जातो. कंपाउंडिंगच्या फायद्यामुळे तुमचा पैसा झपाट्यानं वाढतो. या गुंतवणुकीमुळे तुम्ही काही वेळात कोट्यधीशही बनू शकता.

२० वर्षांत किती जमेल पैसा?

जर तुम्ही एसआयपीमध्ये दरमहा ३,००० रुपये गुंतवले आणि ही गुंतवणूक २० वर्षे सुरू ठेवली तर तुम्ही २० वर्षांत ७,२०,००० रुपयांची गुंतवणूक कराल. पण तुम्हाला १२ टक्के दराने २२,७७,४४४ रुपये व्याज म्हणून मिळतील आणि २० वर्षांनंतर तुम्हाला एकूण २९,९७,४४४ रुपये मिळतील.

२५ वर्षांत किती रक्कम मिळेल?

दुसरीकडे, जर तुम्ही २५ वर्षांसाठी ३,००० रुपयांची गुंतवणूक करत असाल तर २५ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक ९,००,००० रुपये होईल. १२ टक्के दरानं तुम्हाला ४७,९२,९०५ रुपये व्याज म्हणून मिळतील आणि २५ वर्षात तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून एकूण ५६,९२,९०५ रुपये जमवू शकता.

३० वर्षात किती परतावा मिळेल?

सलग ३० वर्षे ही एसआयपी सुरू ठेवल्यास ३० वर्षांत एकूण गुंतवणूक १०,८०,००० रुपये होईल. १२ टक्के दरानं तुम्हाला ९५,०९,७४१ रुपयांचा परतावा मिळेल. अशा प्रकारे गुंतवलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम मिळून तुम्हाला ३० वर्षांनंतर एकूण १,०५,८९,७४१ रुपये मिळतील.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकदिवाळी 2024शेअर बाजार