Indian Young Investors : आर्थिक नियोजनाच्या बाबत आता तरुणाई जागृत झाल्याचे आकडेवारीवरुन समोर आलं आहे. मात्र, सध्याची तरुणाई कुठे सर्वाधिक गुंतवणूक करते? नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. देशातील तरुणांचा मोठा वर्ग म्युच्युअल फंडाऐवजी थेट शेअर बाजारातगुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो. फिनटेक ब्रोकरेज फर्म एंजेल वनच्या अहवालानुसार, सध्या ९३ टक्के तरुण बचत करण्यास प्राधान्य देत आहेत. यापैकी बहुतेकजण त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या २०-३० टक्के बचत करत आहेत. एंजल वनच्या रिपोर्टनुसार शेअर्स हा तरुणांचा आवडता गुंतवणूक पर्याय आहे.
तरुणांचे आवडते गुंतवणूक पर्याय कोणते?सर्वेक्षणातील ४५ टक्के लोक मुदत ठेवी (FD) किंवा सोने यासारख्या पारंपरिक पर्यायांना महत्त्व देतात. तर ५८ टक्के तरुण गुंतवणूकदार शेअर्समध्ये गुंतवणूक करत असल्याचे समोर आले आहे. तर ३९ टक्के लोकांनी म्युच्युअल फंडांला पसंती दिली आहे.
उच्च परताव्यासाठी पर्यायकमी कालावधीत श्रीमंत होण्याचं स्वप्न अनेक तरुण पाहतायेत. यासाठी मोठी जोखीम उचलण्याचीही त्यांची तयारी आहे. त्यामुळे सर्वाधिक तरुणांनी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्यास प्राधान्य दिलं आहे. मुदत ठेवी (२२ टक्के) आणि आवर्ती ठेवी (२६ टक्के) सारखे सुरक्षित पर्याय तुलनेने कमी स्वीकारले जात आहेत.
सर्वेक्षणात १६०० तरुणांचा सहभागदेशातील १३ हून अधिक शहरांतील १६०० तरुणांनी या अभ्यासात भाग घेतला आहे. या प्रश्नावलीत मुख्य ४ विषयांवर आधारित प्रश्न होते. बचत वर्तन, गुंतवणूक प्राधान्य, आर्थिक साक्षरता आणि तंत्रज्ञान आणि आर्थिक साधनांचा वापर. यामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानाची भूमिकाही अधोरेखित करण्यात आली आहे.
का होत नाहीये बचत?अहवालानुसार, ६८ टक्के तरुण नियमितपणे स्वयंचलित बचत साधने वापरत आहेत. शिस्तबद्ध बचत सवयी असूनही ८५ टक्के तरुणांनी जास्त खर्चाचा उल्लेख केला आहे. विशेषतः अन्न, उपयुक्तता आणि वाहतूक हे खर्च बचतीतील सर्वात मोठा अडथळा असल्याचेही त्यांनी नमूद केलं. भारतीय तरुणांपुढे जीवनमानाचा वाढता खर्च हे एक गंभीर आव्हान असल्याचे समोर आलं आहे.