निवृत्तीनंतरच्या प्रवासात आर्थिक समस्या उद्भवू नयेत, यासाठी आपल्याला सुरूवातीपासूनच तयारी करावी लागते. आघाडीची ब्रोकरेज फर्म झिरोदाचे सीईओ नितीन कामत यांच्या मते, आजकाल सेवानिवृत्तीबाबत गंभीर संकट येऊ शकते आणि त्याचा 40 वर्षांखालील तरुण फारसा विचार करत नाहीत. कामत यांनी शनिवारी यासंदर्भात अनेक ट्वीट केले असून निवृत्ती संकटाबाबत विशेष रणनीतीही सुचवली आहे.
कामत यांच्या मते, नव्या तंत्रज्ञानामुळे निवृत्तीचे वय कमी होत आहे. याशिवाय वैद्यकीय प्रगतीमुळे आयुर्मान वाढत आहे. कामत म्हणाले की, जर हवामान बदलामुळे लोकांचा मृत्यू झाला नाही, तर आजपासून 25 वर्षांनंतर निवृत्तीचे संकट बहुतेक देशांमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणून उदयास येऊ शकते. पूर्वीचे लोक भाग्यवान होते. त्यांना दीर्घकालीन रिअल इस्टेट आणि इक्विटी बुल मार्केटच्या माध्यमातून प्रचंड सेवानिवृत्ती निधी उभारण्याची संधी मिळाली, जी भविष्यात दिसत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- कामत यांनी कर्जाबाबत दिलेली पहिली सूचना म्हणजे ज्या गोष्टींची तुम्हाला गरज नाही किंवा ज्यांचे मूल्य येत्या काळात कमी होईल म्हणजेच अवमूल्यन होईल अशा गोष्टींसाठी कर्ज घेणे टाळावे.
- शक्य तितक्या लवकर बचत सुरू करा. तुमचे सर्व पैसे एकाच ठिकाणी गुंतवण्याऐवजी, त्याचे अनेक भागांमध्ये विभाजन करा आणि एफडी, सरकारी सिक्युरिटीजच्या एसआयपी, इंडेक्स फंड आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करा. तसेच दीर्घ मुदतीमध्ये महागाईला मारक परतावा मिळण्यासाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करा.
- स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सर्वसमावेशक आरोग्य विमा पॉलिसी घ्या. आरोग्याशी संबंधित कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास, संपूर्ण सेव्हिंग संपू शकते. म्हणून हे टाळण्यासाठी, विमा पॉलिसीची व्यवस्था करण्याचे सुनिश्चित करा. कायमच तुमची नोकरी राहिल याची शाश्वती नसेल तर नसेल कंपनीकडून विमा पॉलिसी सोडून दुसरी पॉलिसी घ्या.
- कुटुंबातील कोणी तुमच्यावर अवलंबून असल्यास तुमच्या अनुपस्थितीत त्यांच्यासाठी व्यवस्था करा. यासाठी पुरेशी कव्हरेज असलेली टर्म पॉलिसी घ्या. दाव्याच्या रकमेची एफडी अपघात झाल्यास अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास सक्षम असली पाहिजे.