SBI Savings Scheme : भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच रेपो दरात ०.२५ बेसिस पाईंटने कपात केली आहे. यामुळे कर्ज स्वस्त झाली असली तरी मुदत ठेवीचे व्याजदर कमी झाले आहेत. बहुतेक खासगी आणि सरकारी बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केली आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआयने वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात ०.२५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. पण, या कपातीनंतरही, एसबीआयच्या एफडी योजनांमध्ये चांगला परतावा मिळत आहे. एसबीआयच्या एका योजनेत तुम्ही फक्त १ लाख रुपये जमा करून २४,६०४ रुपयांचे निश्चित व्याज मिळवू शकता.
एसबीआयचे एफडीवर ३.५० ते ७.५५ टक्के व्याज
एसबीआयने सर्वसामान्यांसाठी एफडी व्याजदर ३.५०%-७.२५% वरून ३.५०%-७.०५% पर्यंत कमी केले आहेत. ही सरकारी बँक आता ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ४.०० टक्के ते ७.५५ टक्के व्याज देत आहे, जे पूर्वी ७.७५ टक्क्यांपर्यंत होते. स्टेट बँक ऑफ इंडिया २ वर्ष ते ३ वर्षांच्या एफडी योजनांवर सामान्य नागरिकांना ६.९० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.४० टक्के व्याज देत आहे. व्याजदरात कपात करण्यापूर्वी या योजनेवर सामान्य नागरिकांना ७.०० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.५० टक्के व्याज मिळत होते. म्हणजेच, एसबीआयने या योजनेवरील व्याजदर ०.१० टक्क्यांनी कमी केला आहे.
१ लाख रुपयांवर २४,६०४ रुपये निश्चित व्याज
जर तुम्ही एसबीआयमध्ये ३ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला २४,६०४ रुपयांपर्यंत निश्चित व्याज मिळेल. जर तुम्ही सामान्य नागरिक असाल म्हणजेच तुमचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल, तर १ लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला एकूण १,२२,७८१ रुपये मिळतील, ज्यामध्ये २२,७८१ रुपयांचे निश्चित व्याज समाविष्ट आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, म्हणजेच तुमचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल, तर या योजनेत १ लाख रुपये जमा केल्यास तुम्हाला एकूण १,२४,६०४ रुपये मिळतील, ज्यामध्ये २४,६०४ रुपयांचे निश्चित व्याज समाविष्ट आहे.
वाचा - इन्फोसिसमध्ये पुन्हा एकदा नोकरकपात! कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांपुढे ठेवले २ पर्याय
टीप : हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने लिहिला आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा कोणताही आर्थिक धोका पत्करण्यापूर्वी, कृपया तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.