>> डॉ पुष्कर कुलकर्णी
मागील भागात आपण शेअर खरेदी आणि विक्रीचे प्रकार कोणकोणते हे जाणून घेतलं. शेअर बाजार म्हणजे फक्त फायदा आणि फायदा असं नसतं. जसा फायदा होतो, तसेच गुंतवणूकदारास तोटाही सहन करावा लागतो. हा तोटा मर्यादित ठेवण्यासाठी 'स्टॉप लॉस'चा वापर केला जातो.
स्टॉप लॉस म्हणजे नेमके काय?
शेअर खरेदी आणि विक्री व्यवहारात नुकसानाची पातळी ठरविणे म्हणजेच 'स्टॉप लॉस' ठरवून घेणे. इंट्रा डे व्यवहार करताना आपण एखादा शेअर निवडून तो वाढेल या अपेक्षेने खरेदी केलात आणि प्रत्यक्षात त्याचा भाव खाली आला तर आपले नुकसान होते. हे नुकसान मर्यादित ठेवण्यासाठी 'स्टॉप लॉस' लावला लागतो.
उदा. एखादा शेअर भाव वाढेल म्हणून मार्केट रेट १००/- रुपये किमतीत घेतला. जर हा भाव वाढला आणि वाढीव भावात तो शेअर विकला तर आपला फायदा निश्चित असतो. परंतु, भाव खाली गेला आणि पुन्हा विकत घेतलेल्या भावापेक्षा वाढ झाली नाही, तर नुकसान निश्चित आहे. जर या शेअर मध्ये प्रति शेअर ५ रुपये नुकसान सोसायची तयारी असेल तर आपला स्टॉप लॉस रुपये ९५/- हा होतो. शेअर खरेदी केल्यानंतर आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये 'पोजिशन'मध्ये जाऊन एक्सिट ऑप्शनमध्ये 'स्टॉप लॉस' यावर क्लिक करून तिथे ९५/- रुपये नोंद करून स्टॉप लॉस पातळी निश्चित करता येते.
जे गुंतवणूकदार किंवा ट्रेडर्स फक्त शेअर मार्केट व्यवहार करतात; म्हणजे सरळ भाषेत सांगायचं तर मार्केट हीच ज्यांची रोजी रोटी असते, ते पूर्ण वेळ मार्केटवर लक्ष केंद्रीत करू शकतात. परंतु, नोकरी आणि इतर व्यवसाय सांभाळून जे मार्केटमध्ये व्यवहार करतात त्यांना पूर्ण वेळ मार्केट घडामोडींवर लक्ष केंद्रीत करता येत नाही. अशा वेळेस आपण एखाद्या दुसऱ्या कामात बिझी असू आणि आपण विकत घेतलेल्या शेअरचा भाव कोसळला, तर स्टॉप लॉस लावलेल्या भावात तो विकला जातो आणि पुढील अधिक नुकसान टाळले जाते.
याच उलट एखादा शेअर 'शॉर्ट' केला असेल आणि भाव वाढत राहिला तरीही नुकसान निश्चित असते. अशा वेळेस विक्री केलेल्या भावाच्या वरील किंमत स्टॉप लॉस म्हणून लावता येते. सतर्क गुंतवणूकदार नेहमी स्टॉप लॉस लावूनच रोजचे व्यवहार करतो. जसे 'इंट्रा डे' साठी स्टॉप लॉस लावता येतो तसेच ऑप्शन ट्रेडसाठीही लावता येतो.
शेअर म्हणजे काय?, शेअर बाजार किती? आणि 'ब्रोकर' कशासाठी?... समजून घ्या!
शेअर्सची खरेदी-विक्री कशी होते?; त्याचे वेगवेगळे प्रकार समजून घ्या!
शॉर्ट सेल म्हणजे नेमके काय?
एखाद्या शेअरची किंमत मार्केट व्यवहार सुरु असताना खाली येईल, या अपेक्षेने विक्री केला तर त्यास 'शॉर्ट सेल' असं म्हणतात. हा व्यवहार 'इंट्रा डे'मध्ये होतो. उदा. क्ष कंपनीच्या शेअरचा भाव रुपये २१०/ आहे. त्या शेअरमध्ये विशिष्ट कारणाने विक्रीचा दबाव वाढत गेला तर शेअरची किंमत घसरायला लागते. अशा वेळेस ट्रेडर्स या शेअरमध्ये शॉर्ट सेल करतात. शॉर्ट सेलसाठी इंट्रा डे व्यवहारात आपल्या डिमॅट खात्यात हा शेअर असणं आवश्यक आहेच असं नाही. उपलब्ध फंडस् किंवा उपलब्ध मार्जिन फंड वापरून ट्रेडर शॉर्ट सेल करू शकतो. विकलेले शेअर भाव खाली आल्यावर पुन्हा विकत घ्यावे लागतात आणि इंट्रा डे व्यवहार पूर्ण करावा लागतो. विक्री आणि खरेदी या भावातील फरक गुणिले एकूण शेअर्स हा ट्रेडरचा फायदा. यालाच पोझिशन क्लोज करणे असं म्हणतात. सर्वांना या निमित्ताने सूचित करावंसं वाटतं की, इंट्रा डे हा व्यवहार करताना पूर्ण अभ्यास करूनच करावा. यात जसा फायदा दिसतो तसेच जबर नुकसानही होऊ शकते.
ट्रेड पोझिशन म्हणजे काय?
मार्केट सुरू असताना खरेदी आणि विक्री केलेल्या शेअर्सची स्थिती याला 'ट्रेड पोझिशन' म्हणतात. म्हणजेच ही स्थिती मार्केट सुरू असताना ओपन पोझिशन असते. व्यवहार जेव्हा पूर्ण केले जातात तेव्हा हीच स्थिती बंद होते म्हणजेच त्याला क्लोज पोझिशन असं म्हणतात. व्यवहारातून झालेला फायदा आणि तोटा यास रिअलाइझ्ड गेन आणि लॉस असे म्हणतात. हा व्यवहार आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये लेजरमध्ये रोजच्या रोज नोंद होत असतो आणि रोजच्या व्यवहाराची कॉन्ट्रॅक्ट नोट ब्रोकरमार्फत गुंतवणूकदारास पाठविली जाते.
पुढील भागात आपण गुंतवणूकदार कोणकोणत्या प्रकारचे असतात आणि त्यांचा बाजारावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊयात. (क्रमशः)