Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market Concepts: शेअर्सची खरेदी-विक्री कशी होते?; त्याचे वेगवेगळे प्रकार समजून घ्या!

Share Market Concepts: शेअर्सची खरेदी-विक्री कशी होते?; त्याचे वेगवेगळे प्रकार समजून घ्या!

निव्वळ सट्टा म्हणून व्यवहार करणं आणि अभ्यासपूर्ण व्यवहार नसल्यास 'इंट्रा डे'मध्ये मोठं नुकसान होऊ शकतं. स्टॉप लॉस लावून हे व्यवहार करणं अधिक आवश्यक असतं. 

By पुष्कर कुलकर्णी | Published: November 25, 2021 03:58 PM2021-11-25T15:58:36+5:302021-11-25T15:59:01+5:30

निव्वळ सट्टा म्हणून व्यवहार करणं आणि अभ्यासपूर्ण व्यवहार नसल्यास 'इंट्रा डे'मध्ये मोठं नुकसान होऊ शकतं. स्टॉप लॉस लावून हे व्यवहार करणं अधिक आवश्यक असतं. 

Share Market Concepts: different types of buying and selling the equities! | Share Market Concepts: शेअर्सची खरेदी-विक्री कशी होते?; त्याचे वेगवेगळे प्रकार समजून घ्या!

Share Market Concepts: शेअर्सची खरेदी-विक्री कशी होते?; त्याचे वेगवेगळे प्रकार समजून घ्या!

>> डॉ. पुष्कर कुलकर्णी 

मागील भागात आपण शेअर म्हणजे काय? स्टॉक एक्स्चेंज, सेबी, शेअर ब्रोकर, ब्रोकरेज इत्यादी जाणून घेतले. या भागात आपण पुढे जाऊ आणि शेअर खरेदी आणि विक्रीचे प्रकार कोणकोणते आहेत हे जाणून घेऊ. 

शेअर खरेदी आणि विक्रीचे प्रकार कोणकोणते? 
शेअर बाजारात डीमॅटधारक विविध प्रकारे शेअर्स खरेदी करू शकतो आणि विक्रीही करू शकतो. 

डिलिव्हरी - शेअर्स खरेदी करणे आणि ते पुढील काही दिवस, आठवडे किंवा वर्षानुवर्षं ठेवणे, यास डिलिव्हरी खरेदी असं म्हणतात. साधारणतः बाजारात जे गुंतवणूकदार (इन्व्हेस्टर) या गटात मोडतात, ते अशा पद्धतीने व्यवहार करतात. कालांतराने नफा कमावून विक्री केलेल्या शेअर्सला डिलिव्हरी सेल म्हणतात. डिलिव्हरी व्यवहारासाठी ब्रोकरेजचा दर 'इंट्रा डे' व्यवहारापेक्षा जास्त असतो. काही ब्रोकर डिलिव्हरी ट्रेडसाठी ब्रोकरेज आकारत नाहीत. 

इंट्रा डे - एखादा शेअर आज खरेदी केला आणि आजच विकला किंवा या उलट आजच विक्री केला आणि आजच खरेदी केला तर त्यास इंट्रा डे व्यवहार म्हणतात. या व्यवहारात ब्रोकरेज कमी आकारलं जातं. परंतु, निव्वळ सट्टा म्हणून व्यवहार करणं आणि अभ्यासपूर्ण व्यवहार नसल्यास यात मोठं नुकसान होऊ शकतं. तसेच मार्केट चढ-उतारानुसार शेअरचे भाव वर-खाली होत असल्याने सतत मार्केटवर लक्ष असणं आवश्यक असतं. स्टॉप लॉस लावून इंट्रा डे व्यवहार करणं अधिक आवश्यक असतं. 

शेअर म्हणजे काय?, शेअर बाजार किती? आणि 'ब्रोकर' कशासाठी?... समजून घ्या! 

कॉन्ट्रॅक्ट नोट - डिलिव्हरी, इंट्रा डे किंवा फ्युचर / ऑप्शनमध्ये केलेल्या रोजच्या व्यवहाराचा तपशील कॉन्ट्रॅक्ट नोट ब्रोकरतर्फे रोजच्या रोज गुंतवणूकदारास मेलवर पाठविली जाते. यात व्यवहार केलेली वेळ आणि ज्या दारात व्यवहार (ट्रेड बुक) केला, त्याचा सविस्तर तपशील दिला जातो. गुंतवणूकदाराच्या रेकॉर्डसाठी कॉन्ट्रॅक्ट नोट उपयुक्त दस्तऐवज आहे. 

ऑप्शन ट्रेड - वायदा बाजार म्हणजेच ऑप्शन ट्रेड. ज्या कंपन्यांचे समभाग निफ्टी किंवा बीएसईवर लिस्ट आहेत अशा काही समभागांना ऑप्शन ट्रेडसाठी परवानगी दिली जाते. ऑप्शन ट्रेड दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार कॉल ऑप्शन आणि दुसरा प्रकार पुट ऑप्शन. महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी वायदा बाजाराची पूर्तता केली जाते. जर गुरुवारी मार्केटला सुटी असेल तर एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी पूर्तता होते. 

कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन म्हणजे काय? 

एखादा शेअर पुढील काही दिवसांत तेजीत जाईल, या अपेक्षेने वाढीव दराचा ऑप्शन खरेदी करणे याला कॉल ऑप्शन खरेदी करणे असे म्हणतात. यासाठी निवडलेला शेअर प्रत्यक्ष मार्केट दराने घ्यावा लागत नाही. यासाठी त्या शेअरचा लॉट खरेदी करावा लागतो. एक लॉट ठराविक शेअर संख्येचा असतो. एका लॉटसाठी विशिष्ट प्रीमियम ठरविला जातो. त्यानुसार एका लॉटची किंमत ठरते.

उदा. हिंदुस्थान यूनिलिव्हर या कंपनीच्या शेअर ऑप्शनचा लॉट ३०० आहे. म्हणजेच एक लॉट = ३०० शेअर्स. अजून सोप्या भाषेत सांगायचे तर, उदाः हिंदुस्थान युनिलिव्हर शेअरचा मार्केट रेट रुपये २४००/- आहे. महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत हा भाव वाढेल, असा अभ्यास आणि अपेक्षा असेल तर कॉल ऑप्शन खरेदी करता येईल. जर हा भाव २५००/- किंवा त्यापेक्षा अधिक वाढेल, या अपेक्षेने त्या भावाचा कॉल ऑप्शन गुंतवणूकदार खरेदी करतात. २५०० च्या एका लॉटसाठी कॉल ऑप्शनचा दर जर २०/- रुपये असेल तर एका लॉटसाठी रुपये २०/- गुणिले ३०० (एक लॉट मध्ये ३०० शेअर्स यानुसार) एकूण रुपये ६,०००/- इतका प्रीमियम होतो. म्हणजेच एक लॉट खरेदी करायचा असेल तर ६०००/- रुपये मोजावे लागतील. आता जर अपेक्षेनुसार भाव वाढत गेला तर याच प्रीमियमचा दर त्यानुसार वाढत जातो. खरेदी केलेला ऑप्शन लॉट गुंतवणूकदारास कोणत्याही क्षणी विक्री करता येतो. जर प्रीमियम वाढलेला असेल, उदाः २०/- चा प्रीमियम जर २५/- रुपये पोचला तर एक लॉटमध्ये ५ रुपये गुणिले ३०० शेअर्स असा एकूण रुपये १,५००/- चा फायदा गुंतवणूकदार प्राप्त करू शकतो. जसा फायदा तसा तोटाही होऊ शकतो, याची प्रत्येक गुंतवणूकदाराने नोंद घेणे आवश्यक असते. 

आता जसा कॉल ऑप्शन तसाच पुट ऑप्शन. यामध्ये, भविष्यात शेअरचा भाव खाली येईल, या अपेक्षेने ट्रेडर पुट ऑप्शन लॉट खरेदी करू शकतो. जर भविष्यात भाव खाली आले तर त्यानुसार पुट ऑप्शनचा प्रीमियमचा दर वाढत जातो. खरेदी केलेला पुट ऑप्शन प्रिमियम आणि त्यानंतरचा वाढीव प्रीमियम यामधील फरक हा प्रत्यक्ष फायदा असतो. कॉल आणि पुट या दोनही ऑप्शन प्रकारात खरेदी आणि विक्रीसाठी ब्रोकर प्रत्येक लॉटनिहाय कमिशन आकारतो. महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी वायदेबाजारची पूर्तता करताना एखाद्या ऑप्शनचा भाव शून्यही होऊ शकतो. यासाठी इंट्रा डे व्यवहाराप्रमाणेच ऑप्शन व्यवहारात स्टॉप लॉसचा अवलंब केल्यास अधिक नुकसान टाळता येते. 

पुढील भागात आपण 'स्टॉप लॉस' म्हणजे काय हे जाणून घेऊ. 
(क्रमशः)

Web Title: Share Market Concepts: different types of buying and selling the equities!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.