>> डॉ. पुष्कर कुलकर्णी
मागील भागात फेस व्हॅल्यू, आयपीओ, लिस्टिंग आणि लिस्टिंग गेन म्हणजे काय हे जाणून घेतले. आता या भागात आपण अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय हे जाणून घेऊ.
बाजार सकाळी नऊ वाजता सुरू झाल्यावर प्री-ओपनिंग सेशन असते. यानंतर बरोबर सव्वा नऊ वाजता व्यवहार सुरू होतात. हे व्यवहार सुरू झाल्यानंतर किंवा त्यापूर्वी प्री-ओपनिंग सेशनमध्ये शेअरला अप्पर सर्किट किंवा लॉअर सर्किट लागू शकते. हे सर्किट शेअर किमतीच्या ५ टक्के, १० टक्के, १५ टक्के आणि २० टक्के या प्रमाणात असते. हे प्रमाण त्या शेअरच्या मागील काही दिवसांच्या दैनंदिन खरेदी-विक्रीच्या एकूण संख्येवर ठरविले जाते. त्यास व्हॉल्युम असे म्हणतात.
अप्पर सर्किटमध्ये शेअर विक्रीसाठी कोणीही बोली लावत नाही तर फक्त खरेदीदारच असतात. अशा वेळेस शेअरचा भाव वधारून जे सर्किट लिमिट ठरविले आहे तिथपर्यंत पोहोचला, तर त्यास अप्पर सर्किट लागते. सर्किट लागल्यानंतर एक्सचेन्जद्वारे ठरविलेल्या वेळेनुसार व्यवहार थांबविले जातात. या वेळेनंतर सर्किट उघडले जाते आणि पुन्हा खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होतात. हे व्यवहार सुरू झाल्यावर जर पुन्हा फक्त खरेदीदारच पुढे आले आणि विक्री करण्यासाठी कोणीही तयार नसल्यास पुन्हा पुढील अप्पर सर्किट लागते. ठराविक वेळेनंतर हे सर्किट पुन्हा उघडले जाते आणि पुन्हा व्यवहार सुरू होतो. पुढे वाढलेले भाव लक्षात घेता जर या शेअर मध्ये प्रॉफिट बुक करावा असे वाटले तर विक्रीचा मारा सुरू होऊ शकतो आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्ववत होऊन त्या शेअरचा योग्य भाव हा त्यानुसार ठरला जातो.
हेही वाचाः IPO म्हणजे काय रे भाऊ?; 'लिस्टिंग'च्या वेळची किंमत कशी ठरते?.. वाचा!
हेही वाचाः शेअर बाजारातील 'बुल' आणि 'बेअर' म्हणजे काय?... जाणून घ्या
जसे अप्पर सर्किट त्याचनुसार लोअर सर्किट. यामध्ये खरेदीदार कोणीही पुढे येत नाही फक्त विक्रीचा मारा सुरू असतो आणि ठराविक सर्किटपर्यंत जर त्या शेअरची किंमत खाली आली, तर त्यास लोअर सर्किट लागते. सर्किट ओपन झाल्यावर जर खरेदीदार पुढे आले आणि शेअर खरेदी करू लागले तर व्यवहार सुरू राहतात. जर पुन्हा विक्री वाढली आणि खरेदीदार कोणीही पुढे आले नाहीत, तर पुढील लोअर सर्किट लागू शकते. खाली आलेला भाव आकर्षक पातळीवर आहे, असे वाटल्यास खरेदीदार गुंतवणूक करण्यास इच्छुक होऊ शकतात आणि पुन्हा अशा शेअरमध्ये खरेदी सुरू होऊ शकते.
काही वेळा आपणास असेही पाहायला मिळते की, सकाळच्या सत्रात एखाद्या शेअरला अप्पर किंवा लोअर सर्किट लागले तर बाजार बंद होतेवेळीसुद्धा ते सर्किट उघडत नाही आणि सर्किट लागलेल्या कमी किंवा जास्त किमतीच्या भावात शेअरची किंमत क्लोज होते. मग अशा वेळेस दुसऱ्या दिवशी बंद झालेला भाव हा प्री-ओपनिंग स्टेशनमधील खरेदी आणि विक्रीच्या संख्येवर निर्धारित होऊन ओपन किंमत ठरली जाते. आश्चर्यकारकरित्या काही वेळेस काही शेअरमध्ये एकाच दिवशी अप्पर आणि लोवर सर्किट सुद्धा पाहावयास मिळते. अशा वेळेस तो शेअर प्रचंड व्होलाटाइल आहे असे म्हणतात. इंट्रा डे व्यवहार करताना अशा व्होलाटाइल शेअरमध्ये व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते. जसा फायदा तसंच मोठं नुकसानही होऊ शकते.
हेही वाचाः शेअर बाजारात 'ट्रेडिंग' करायचं असेल Stop Loss माहीत हवाच
हेही वाचाः शेअर्सची खरेदी-विक्री कशी होते?; त्याचे वेगवेगळे प्रकार समजून घ्या!
का लागते लोअर किंवा अप्पर सर्किट?
एखाद्या शेअरला लोअर किंवा अप्पर सर्किट खालील कारणांमुळे लागू शकते.
१. तिमाही किंवा वार्षिक निकाल अपेक्षेपेक्षा खूपच उत्तम किंवा अपेक्षेपेक्षा खूपच खराब लागणे.
२ कंपनीच्या विरोधात मोठी तक्रार किंवा विसल ब्लोर अंतर्गत सेबीकडे तक्रार नोंदली जाणे.
३. शासकीय निर्बंध किंवा असे निर्णय जे संबंधित कंपनीच्या व्यवसायाशी निगडीत असतील असे.
४. कंपनीचे अधिग्रहण केले जाणे किंवा कंपनीने दुसऱ्या कंपनीचे अधिग्रहण करणे.
५. शेअर स्प्लिट किंवा बोनस शेअर संदर्भात गुंतवणूकदारांना अत्यंत फायद्याचा निर्णय घेतला जाणे.
या व्यतिरिक्तही काही अशा गोष्टी ज्या थेट कंपनीच्या हितात किंवा तिच्या व्यवसायात थेट बाधा आणली जाईल असे असल्यास अशामुळे अप्पर किंवा लोअर सर्किट लागण्याची शक्यता असते. गुंतवणूकदारांनी अशा शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या कारणांचा अभ्यास करणे आवश्यक असते.
निफ्टी आणि बीएसई लोअर आणि अप्पर सर्किट ब्रेक - जसे प्रत्येक शेअरला अप्पर किंवा लोअर सर्किट असते, तसेच निफ्टी, बँक निफ्टी आणि बीएसई यालाही अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट लागू असते. कोरोनामध्ये मार्च २०२० मध्ये आपणास हे अनुभवायला मिळाले. एकाच दिवशी निफ्टी आणि बीएसईला लोअर सर्किट लागले. त्या दिवशी बाजारात कोरोनामुळे प्रचंड विक्रीचा दबाव होता आणि सर्वत्र विक्रीच्या माऱ्याने निफ्टीमधील सर्व इंडेक्स झपाट्याने खाली आले.
पुढील भागात डिव्हीडंड, बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट म्हणजे काय ते पाहू. (क्रमशः)