>> डॉ. पुष्कर कुलकर्णी
कंपनीचा जसा व्यवसाय आणि उलाढाल वाढत जाते तेव्हा नफाही वाढत जातो. जसजसा नफा वाढत जाईल तशी शेअरला मागणीही वाढत जाते. नफ्यात चालणारी कंपनी नेहमीच शेअर होल्डरचे हित लक्षात घेत असते आणि त्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करते. फायद्यात वाटेकरी करण्यासाठी शेअरधारकांस डिव्हीडंड जाहीर करते.
डिव्हीडंड म्हणजे नेमके काय?
नफ्यातील हिस्सेदारी प्रत्येक शेअरधारकास वाटणे यास डिव्हीडंड असे म्हणतात. कंपनीने डिव्हीडंड दिलाच पाहिजे असे बंधन नाही. कंपनीची उलाढाल आणि विक्री वाढून जर करपश्चात नफा असेल तर बोर्ड बैठकीत डिव्हीडंड देण्याचा निर्णय घेतला जातो. हा डिव्हिडंड शेअरच्या फेस व्हॅल्यूवर काही टक्केवारीत किंवा प्रती शेअर ठराविक रक्कम ठरवून जाहीर केला जातो. डिव्हीडंड देण्यासाठी कट-ऑफ तारीख निश्चित केली जाते. या दिवशी ज्यांच्या नावावर शेअर असतील त्यांना डिव्हीडंड अलॉटमेंट तारखेस प्रत्यक्ष पेआऊट केले जाते. हा डिव्हीडंड शक्यतो शेअरधारकाच्या बँक अकाउंटमध्ये जमा केला जातो. डिव्हीडंड मिळकत ही करपात्र असून गुंतवणूकदारास यावर कर लागू असतो.
बोनस शेअर
जेव्हा कंपनीची उलाढाल वाढते आणि कंपनी नफ्यात असते तेव्हा शेअर धारकांस असा नफा बोनस शेअरच्या रूपात दिला जातो. बोर्ड बैठकीत हा निर्णय घेतला जातो. शेअर धारकांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जातो. ज्या दिवशी बोनस शेअर देण्याचं ठरतं त्याच दिवशी कट-ऑफ तारीख निश्चित केली जाते. या तारखेस कंपनीच्या रेकॉर्डवर जे शेअरधारक असतील अशा सर्वांना ठरविलेल्या रेशोनुसार बोनस शेअर दिले जातात. हे बोनस शेअर डिमॅट अकाउंटवर क्रेडिट केले जातात.
बोनस शेअर चे प्रमाण कसे मोजावे?
१:१ - एका शेअरला एक बोनस शेअर
२:१ - प्रत्येक एक शेअरला दोन बोनस शेअर
१:२ - प्रत्येक दोन शेअरला एक शेअर बोनस.
बोनस शेअर दिल्यानंतर शेअरच्या भावावर परिणाम होतो का?
याचे उत्तर होय असे आहे. ज्या रेशोमध्ये बोनस शेअर दिले जातात त्याच रेशोप्रमाणे शेअरचा भाव कमी होतो. उदा. बोनस देण्यापूर्वी एक्स कंपनीचा भाव ५००/- रुपये असेल आणि जर एकास एक या प्रमाणात बोनस दिला, तर बोनस अलॉटमेंट पश्चात तो भाव २५०/- रुपये प्रति शेअर असा होतो. जे गुंतवणूकदार दीर्घकालीन असतात त्यांना बोनस शेअर हे नेहमीच फायद्याचे असते. कारण बोनस दिल्यानंतर खाली आलेल्या भावात पुन्हा खरेदी आणि विक्रीची उलाढाल होत असते आणि जर कंपनीचा व्यवसाय उत्तम चालला, तर शेअरचा भाव वधारत जातो. यामुळे दीर्घकालीन शेअर गुंतवणूदारास यातून फायदाच होत असतो. अनेक नामवंत कंपन्या आपल्या शेअर धारकांस बोनस शेअर देऊन मालामाल करीत असतात.
शेअर स्प्लिट म्हणजे काय?
शेअरची फेस व्हॅल्यू कमी करून त्या प्रमाणात शेअर्सचे विभाजन केले जाते त्यास शेअर स्प्लिट असे म्हणतात. उदाहरण म्हणून आयआरसीटीसीच्या नुकत्याच झालेल्या शेअर स्प्लिटचे घेता येईल. मूळ फेस व्हॅल्यू १०/- रुपये चा एक शेअर १:५ या प्रमाणात स्प्लिट केला गेला. यामुळे स्प्लिट केल्यानंतर फेस व्हॅल्यू रुपये २/- झाली. ज्यांच्याकडे एक शेअर होता त्यांना ४ अतिरिक्त शेअर्स दिले गेले आणि एका शेअरचे ५ शेअर्स झाले.
स्प्लिट नंतर भाव कमी होतो का?
होय, स्प्लिट नंतर भाव कमी होतो. ज्या प्रमाणात स्प्लिट त्याच प्रमाणात भाव अड्जस्ट होतो. वरील उदाहरणात स्प्लिट करते वेळी कट-ऑफ डेटला आयआरसीटीसीचा एक शेअर ज्या भावात होता तो १:५ स्प्लिट रेशो नुसार भाव १/५ झाला. शेअर स्प्लिटमुळे बाजारात एकूण शेअर्सची संख्या वाढते.
दीर्घकालीन गुंतवणूकदारांस बोनस आणि शेअर स्प्लिट चा खूपच फायदा होत असतो हे सिद्ध झाले आहे.
पुढील भागात फंडामेंटल म्हणजे काय हे समजून घेऊ. (क्रमशः)
हेही वाचाःअप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय?; ते कधी, कशामुळे लागतं?
हेही वाचाःIPO म्हणजे काय रे भाऊ?; 'लिस्टिंग'च्या वेळची किंमत कशी ठरते?.. वाचा!
हेही वाचाःशेअर बाजारात 'ट्रेडिंग' करायचं असेल Stop Loss माहीत हवाच