मुंबई : सन २०२१ मध्ये शेअर बाजाराने काही विक्रमांची नोंद केली. गुंतवणूकदारांनी चढ-उतार दोन्ही पाहिले. देशातील कोरोना संकट, पेट्रोल-डिझेलच्या किमती, गॅसची दरवाढ, अर्थसंकल्प याचे थेट परिणाम बाजारावर झाल्याचे पाहायला मिळाले. असे असले तरी कंपन्यांचे IPO शेअर बाजारात येण्याचे प्रमाणही वाढल्याचे पाहायला मिळत आहे. आता नव्या आर्थिक वर्षातील पहिल्याच महिन्यात तब्बल ६ कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये येणार आहेत. (six companies ipo will be come in share market)
गेल्या आर्थिक वर्षात भांडवली बाजारात तब्बल ११ आयपीओ आले होते. यातील काहींनी गुंतवणूकदारांना बंपरनफा कमावून दिला. काहींनी गुंतवणूकदारांना अगदी निराश केले. मात्र, नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात किमान ६ कंपन्या प्राथमिक बाजारात आपले नशीब आजमावणार आहेत. आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या तेलंगणामधील केआयएमएस या कंपनीकडून ७०० कोटींच्या IPO साठी सेबीकडे प्रस्ताव पाठवला आहे. यात किमान २०० कोटींचे शेअर खुले केले जाणार आहेत. याच महिन्यात कंपनीकडून IPO जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ! कर्ज फेडण्यासाठी बँकेलाच विकलं हेड ऑफिस
मायक्रोटेक डेव्हलपर्स, सोना कॉमस्टारचे IPO
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मायक्रोटेक डेव्हलपर्स या कंपनीचा IPO बाजारात येणार आहे. किमान २५०० कोटी उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असून, ७ एप्रिल रोजी कंपनीची समभाग विक्री खुली होणार असून ९ एप्रिलपर्यंत अर्ज करता येईल. वाहनांच्या सुट्ट्या भागांची निर्मिती करणारी सोना कॉमस्टार या कंपनीचा IPO बाजारात येत असून, समभाग विक्रीतून तब्बल ६००० कोटींचा निधी उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये ३०० कोटींचे नवीन शेअर्स विक्रीसाठी खुले करण्यात येणार आहेत.
सेव्हन आयलॅंड शिपिंग, आधार हाऊसिंग फायनान्स
आधार हाऊसिंग फायनान्स या गृह वित्त पुरवठा क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा तब्बल ७ हजार ३०० कोटींचा IPO एप्रिल महिन्यात बाजारात येणार आहे. या कंपनीमध्ये ब्लॅकस्टोन कंपनीची मोठी गुंतवणूक आहे. यासाठी कंपनीकडून सेबीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सेव्हन आयलॅंड शिपिंग या कंपनीकडून ६०० कोटींचा IPO बाजारात येणार आहे. या योजनेला नुकतीच सेबीकडून परवानगी देण्यात आली. आयपीओमध्ये कंपनी ४०० कोटींच्या नव्या शेअर्सची विक्री करणार आहे. याशिवाय डोडला डेअरी या कंपनीकडून IPO जाहीर होणार असून, हैदराबादमधील या कंपनीकडून प्राथमिक बाजारातून ५० कोटींचे नवे शेअर्स विक्री केले जाणार आहे. आयपीओमध्ये कंपनी एक कोटी शेअरची विक्री करणार आहे.