Lokmat Money > बिझनेस न्यूज > Share Market Basics: शेअर म्हणजे काय?, शेअर बाजार किती? आणि 'ब्रोकर' कशासाठी?... समजून घ्या! 

Share Market Basics: शेअर म्हणजे काय?, शेअर बाजार किती? आणि 'ब्रोकर' कशासाठी?... समजून घ्या! 

Share Market Basics : शेअर बाजार म्हणजे अथांग समुद्र असून गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. ज्यांची सखोल अभ्यास करायची तयारी आहे आणि संयम, चिकाटी हे गुण ज्यांच्याकडे आहेत, ते गुंतवणार इथे यशस्वी होतात.

By पुष्कर कुलकर्णी | Published: November 24, 2021 04:13 PM2021-11-24T16:13:00+5:302021-11-24T16:13:28+5:30

Share Market Basics : शेअर बाजार म्हणजे अथांग समुद्र असून गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. ज्यांची सखोल अभ्यास करायची तयारी आहे आणि संयम, चिकाटी हे गुण ज्यांच्याकडे आहेत, ते गुंतवणार इथे यशस्वी होतात.

spacial article on know Share Market Basics what are shares and brokers | Share Market Basics: शेअर म्हणजे काय?, शेअर बाजार किती? आणि 'ब्रोकर' कशासाठी?... समजून घ्या! 

Share Market Basics: शेअर म्हणजे काय?, शेअर बाजार किती? आणि 'ब्रोकर' कशासाठी?... समजून घ्या! 

डॉ. पुष्कर कुलकर्णी 

शेअर बाजाराबाबत अनेक समज आणि गैरसमज अनेकांच्या मनात असतात आणि असणे स्वाभाविक आहे. शेअर बाजार म्हणजे बक्कळ पैसे कमविण्याचे साधन, शेअर बाजार म्हणजे जुगार, शेअर बाजार म्हणजे श्रीमंतांचा खेळ, शेअर बाजार म्हणजे कष्टाचे पैसे बुडविणे इत्यादी इत्यादी. मात्र, शेअर बाजार म्हणजे अथांग समुद्र असून गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. ज्यांची सखोल अभ्यास करायची तयारी आहे आणि संयम, चिकाटी हे गुण ज्यांच्याकडे आहेत, ते गुंतवणार इथे यशस्वी होतात.

शेअर बाजाराबद्दलचं आकर्षण हे गेल्या दीड वर्षांमध्ये वाढलं आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये अनेकांनी शेअर बाजाराचे उतार आणि चढाव अनुभवले आहेत. याच दरम्यान भारतात एक कोटीहून अधिक डिमॅट अकाउंट नव्याने सुरू झाली.  कोरोना काळात सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजाराने 'व्ही शेप'मध्ये रिकव्हरी केली. ही कामगिरी फक्त भारतीय शेअर बाजारातच नव्हे, तर जगातील सर्व देशांमधील महत्त्वाच्या शेअर बाजारांनी अनुभवली. ही एकतर्फी  तेजी आता आत्तापर्यंत सुरू असून यालाच मोठा 'बुल रन' असे म्हणावे लागेल. बाजारात नव्याने सुरुवात केलेल्यांना आणि ज्यांचा अभ्यास नाही अशा सर्व गुंतवणूकदारांना शेअर बाजाराची पूर्ण ओळख करून घेणे आवश्यक आहे. अगदी शेअर म्हणजे काय इथपासून बाजारातील व्यवहाराशी निगडित महत्त्वाच्या संकल्पना जाणून घेणे आवश्यक आहे. बाजारातील काही मूळ संकल्पना अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेत जाणून घेऊया आणि एक परिपक्व गुंतवणूकदार म्हणून स्वतःची ओळख करून घेऊया.  

शेअर म्हणजे काय? 
शेअर म्हणजे समभाग. शेअर हा इंग्रजी शब्द आहे. शेअरलाच स्टॉक असेही म्हणतात. कंपनीचे एकूण भाग भांडवल अनेक समभागात विभाजित केले असते.  प्रत्येक समभाग म्हणजे एक शेअर. आपण शेअर होल्डर असतो, याचा अर्थ आपण त्या कंपनीचे अंशतः मालक असतो. हे शेअर स्टॉक एक्सचेंजमार्फत आपल्या ब्रोकरकडून आपण विकत घेऊ शकतो आणि विक्री करू शकतो. कंपनीला तिच्या विस्तारासाठी अधिक निधीची आवश्यकता असते. हा निधी बाजारातून आय. पी. ओ. (इनिशिअल पब्लिक ऑफर) द्वारे उभारला जातो. या संदर्भात पुढच्या लेखांमध्ये सविस्तर माहिती येईलच.

स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?
शेअरची खरेदी आणि विक्री ज्या माध्यमातून होते त्याला स्टॉक एक्सचेंज असे म्हणतात. भारतात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) अशी दोन एक्सचेंज आहेत. ज्या कंपन्या यापैकी एक किंवा दोन्ही एक्सचेंजवर नोंद आहेत, ज्याला आपण 'लिस्ट' आहेत असे म्हणतो. त्यांच्या समभागांची खरेदी आणि विक्री ब्रोकरमार्फत केली जाते. लिस्टेड कंपन्या आणि स्टॉक एक्सचेन्ज यावर सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) मार्फत नियंत्रण ठेवले जाते. सेबीची निर्मिती भारत सरकारने गुंतवणूकदारांच्या हिताच्या संरक्षणासाठी केली आहे. 

मार्केटची वेळ काय? 
सोमवार ते शुक्रवार ( सुटीचे दिवस वगळून) मार्केट सकाळी ९ वाजता सुरू होतं आणि दुपारी ३.३० वाजता बंद होतं. सकाळी ९ ते ९.०८ हा  वेळ प्री-ओपनिंग सेशन असतो यात कालच्या बंद स्थितीतून इंडेक्स ऍडजस्ट होतो आणि तोच ओपनिंग इंडेक्स असतो. सकाळी ९.१५ ला व्यवहार सुरू होतात आणि दुपारी ३..३० ला बंद होतात. इंट्रा डे व्यवहार दुपारी ३.१५ ला थांबतात.

 शेअर ब्रोकर म्हणजे कोण?
स्टॉक एक्सचेंज आणि शेअर धारक यांच्या मधील दुवा म्हणजे शेअर ब्रोकर. शेअर खरेदी आणि विक्री यांच्यामार्फत केली जाते. या व्यवहारापोटी ब्रोकर कमिशन आकारतो. शेअर खरेदी आणि विक्रीसाठी ब्रोकरकडे आपले डीमॅट अकाउंट असणे आवश्यक असते. अधिकृत पॅन कार्ड धारक कोणत्याही ब्रोकरकडे आपले डीमॅट अकाऊंट सुरू करून शेअरची खरेदी आणि विक्री सुरू करू शकतो. यासाठी डीमॅट अकाउंटशी संलग्न केलेल्या आपल्या बँकेच्या खात्यातून ब्रोकरच्या अकाऊंटमध्ये रक्कम जमा करावी लागते. ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने इंटरनेट बँकिंग अथवा युपीआयद्वारे जमा करता येते. डीमॅट अकाउंट अधिकृत शेअर ब्रोकरचे मोबाईल ऍप इन्स्टॉल करून आवश्यक कागदपत्रांची ऑनलाईन पूर्तता करून सुरू करता येते. 

ब्रोकरेज म्हणजे काय? 
आपण खरेदी आणि विक्री केलेल्या शेअरवर जे कमिशन आकारले जाते त्यास ब्रोकरेज म्हणतात. या ब्रोकरेजचा दर डिलिव्हरी / इंट्रा डे / ऑप्शन्स या ट्रेड नुसार वेगवेगळा असतो. 

पुढील भागात शेअर खरेदी आणि विक्रीचे प्रकार जाणून घेऊयात. 
(क्रमशः)

Web Title: spacial article on know Share Market Basics what are shares and brokers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.