Share Market : जगावर मंदीचे सावट असताना भारतीय शेअर बाजाराची जोरदार घोडदौड सुरू आहे. गुरुवारी (12 सप्टेंबर 2024) दुपारी 2 नंतर शेअर बाजारात जोरदार लाट झाली. सकाळपासून 25,000 च्या आसपास उभ्या असलेल्या निफ्टी50 ने अवघ्या तासाभरात 25,400 चा टप्पा पार केला. सेन्सेक्स आणि बँक निफ्टीमध्येही अशीच जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. काल निफ्टी50 ची ‘एक्सपायरी’ होती. तुम्हाला शेअर बाजारातील फ्युचर्स आणि ऑप्शन्सची माहिती नसेल तर ‘एक्सपायरी’ देखील तुमच्यासाठी नवीन आहे. याबद्दल आपण बोलूच. पण, कालच्या बाजारात अनेक गुंतवणूकदार मालामाल झाले. अवघ्या एका तासात अशी उसळी आली की 25 पैशांचा कॉल ऑप्शन 123 रुपयांवर पोहोचला. ही 49,100 टक्के मूव्ह आहे. जर एखाद्याने या परिस्थितीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे पैसे 4,91,00,000 रुपये (४ कोटी) झाले असते.
फ्युचर अँड ऑप्शन्स काय आहे?शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांकडे पैसे इनवेस्ट करण्याचे अनेक पर्याय आहेत. यामध्ये इक्विटीमध्ये गुंतवणूक हे सर्वात लोकप्रिय माध्यम आहे, ज्यामध्ये तुम्ही शेअर खरेदी करुन होल्ड करता. हा शेअर तुमच्याकडे 1 दिवसापासून महिने किंवा अगदी वर्षांपर्यंत ठेवू शकता. दुसरी पद्धत म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन्स (F&O). फ्युचर्स आणि ऑप्शन्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, ज्याचा वेगवेगळा ट्रेड केला जाऊ शकतो. फ्युचर्समध्ये ट्रेड करण्यासाठी तुम्हाला खूप पैशांची गरज असते. त्याउलट ऑप्शन्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला खूप कमी पैशांची गरज लागते. ऑप्शन्स विक्रीतून अधिक पैसे मिळण्याची शक्यता असते. यामुळे लहान गुंतवणूकदार, कमी पैसे गुंतवून प्रचंड नफा मिळविण्यासाठी, अनेकदा ऑप्शन खरेदी करतात.
ऑप्शन खरेदी करताना तुम्हाला कॉल किंवा पुटवर पैसे गुंतवावे लागतात. जर तुम्ही कॉलवर पैसे गुंतवलेत आणि मार्केट वर गेल्यास तुम्हाला फायदा होतो. आणि मार्केट पडलं तर तुमचा खिसा खाली होतो. याउलट पुट खरेदी करून, जेव्हा बाजार घसरतो तेव्हा तुम्हाला नफा मिळतो. बाजार वर गेल्यावर पुट खरेदी करणाऱ्यांचे नुकसान होते.
कॉलची जादू चाललीगुरुवारी शेअर बाजारात मोठा चढ-उतार दिसून आला. ज्या लोकांनी या हालचालीत कॉल खरेदी केले त्यांना हजारो टक्के रिटर्न मिळाले असते. ट्रेड कुठे खरेदी केला आणि आपला प्रॉफिट बुक केला यावर रिटर्न अवलंबून असतात. शेअरबाजारात एक म्हण प्रसिद्ध आहे. कुणीही बॉटमला खरेदी करू शकत नाही की टॉपला विक्री करू शकतात. सर्वजण मध्ये एन्ट्री घेतात आणि मधेच कुठेतरी प्रॉफिट बूक करुन बाहेर पडतात. काल शेअर बाजारात निफ्टी५० ची साप्ताहिक एक्स्पायरी होती. दोन प्रकारचे एक्सपायरी आहेत - मासिक आणि साप्ताहिक. निफ्टी५० ची साप्ताहिक एक्स्पायरी दर गुरुवारी होते, तर मासिक एक्स्पायरी दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी होते. बहुतेक लोक साप्ताहिक एक्स्पायरीमध्ये ट्रेड करण्यास प्राधान्य देतात. कारण साप्ताहिकात प्रीमियम कमी असतात आणि कमी पैशात ट्रेडिंग करता येतो.
(Disclaimer: ही बातमी केवळ माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तज्ञांचा सल्ला घ्या.)