Join us

१०.७३ लाख कोटी पाण्यात! अदानी समूहामुळे शेअर बाजारात भयकंप, सेबी करणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 6:49 AM

अदानी समूहातील मोठ्या हेराफेरीचा अहवाल अमेरिकेची संशोधन संस्था हिंडेनबर्गने समोर आणल्यानंतर शेअर बाजारात त्सुनामी आली आहे.

मुंबई :

अदानी समूहातील मोठ्या हेराफेरीचा अहवाल अमेरिकेची संशोधन संस्था हिंडेनबर्गने समोर आणल्यानंतर शेअर बाजारात त्सुनामी आली आहे. अहवालात व्यक्त करण्यात आलेल्या भीतीच्या काळ्या छायाचे गडद परिणाम बाजारावर होत केवळ दोन दिवसांमध्ये शेअर बाजार १,६४७ अंकांनी कोसळला. परिणामी गुंतवणूकदारांची संपत्ती तब्बल १०.७३ लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे. 

अदानी समूहाच्या सर्वच कंपन्यांच्या समभागांमध्ये जवळपास २५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली असून, समूहाचे तब्बल ४.१७ लाख कोटी रुपयांचे नुकसान दोन दिवसांत झाले आहे. शेअर बाजारातील व्यवहार आपल्याला वाटेल तसा फिरवणे आणि हिशोबाचा घोळ यावर बोट ठेवल्याने अदानी समूहाचे शेअर गडगडले आहेत. त्याचा फटका म्हणून शेअर बाजार कोसळला. अदानी समूहाचे समभाग कोसळण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या बँकांचे समभागही दणक्यात आपटले. 

सेबी करणार चौकशीअहवाल समोर आल्यानंतर आता बाजार नियामक सेबी सतर्क झाली असून, अहवालात विचारलेल्या ८६ प्रश्नांबाबत सखोल चौकशी करणार आहे. अदानी ग्रुपच्या अलीकडील व्यवहारांची काटेकोरपणे छाननी करण्याचे धोरण सेबीने अंगीकारले आहे. यामुळे जोपर्यंत अहवालावर योग्य उत्तर मिळत नाही तोपर्यंत समभाग घसरण्याची भीती व्यक्त होत आहे.  

श्रीमंतांच्या यादीतील स्थान घसरले- फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत अदानी समूहाचे मालक गौतम अदानी चौथ्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. - २५ जानेवारीला त्यांची एकूण संपत्ती ९.२० लाख कोटी रुपये होती, जी शुक्रवारी ७.७६ लाख कोटींवर आली. - जगातील प्रमुख श्रीमंतांच्या यादीतून नुकतेच अंबानीही बाहेर पडले आहेत.

४.१७ लाख कोटींचा अदानी समूहाला फटकाहिंडेनबर्ग अहवाल आल्यानंतर अदानी समूहाचे समभाग सलग दोन दिवस घसरले आहेत. ही घसरण ५ ते २५ टक्क्यांपर्यंत आहे. यामुळे समूहाला ४.१७ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कंपनी सध्या हिंडेनबर्ग समूहावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करीत आहे. मात्र, हिंडेनबर्गनेही आपण कायदेशीर लढाईस तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अदानी समूहासाठी पुढील काही दिवस संकटाचे ठरतील, अशी चिन्हे आहेत.

टॅग्स :गौतम अदानीशेअर बाजार