OYO Profit : ऑनलाइन हॉटेल अॅग्रीगेटर ओयोने (OYO) एका आर्थिक वर्षात प्रथमच नफ्याची नोंद केली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा १०० कोटी रुपये झाला. कंपनीचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी आज ३० मे रोजी यासंदर्भातील माहिती दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी कंपनी मजबूत आर्थिक स्थितीत असल्याचा दावा केला आहे. कंपनीनं सलग आठ तिमाहीत सकारात्मक एबिटडा आणि सुमारे १००० कोटी रुपयांचा कॅश बॅलन्स नोंदवला आहे. मात्र, हे प्रोव्हिजनल नंबर्स आहेत. ऑडिट केलेले आर्थिक आकडे याच्या जवळपासच असतील असा विश्वास रितेश अग्रवाल यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ओयो फॅमिली ऑफिसमधून तीन ते चार अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर ८ ते ९० दशलक्ष डॉलर्स उभारण्याचा विचार करत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला हॉस्पिटॅलिटी युनिकॉर्ननं दुसऱ्यांदा आपला आयपीओ अर्ज मागे घेतला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ओयोनं आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ८८८ कोटी रुपयांचा (१०७ मिलयन डॉलर्स) अॅडजस्टेड एबिटडा नोंदविला, जो आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २७४ कोटी रुपये (३३ मिलियन डॉलर्स) होता.
काय म्हणाले अग्रवाल?
केवळ भारतातच नव्हे, तर ओयोच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये नॉर्डिक, साऊथ इस्ट आशिया, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही वाढीची अपेक्षा आहे. "एक आनंदी ग्राहक किंवा हॉटेल भागीदार माझ्या चेहऱ्यावर सर्वाधिक हास्य आणतो. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथमच आम्ही नफ्यात आलो आणि सुमारे १०० कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली," अशी प्रतिक्रिया अग्रवाल यांनी दिली.