Join us  

'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 2:15 PM

Railway Adani Group : रेल्वेशी संबंधित कंपनीला अदानी समूहाकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि काय करणार काम.

Railway Adani Group : रेल्वेशी संबंधित कंपनी राइट्स लिमिटेडला अदानी समूहाकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. अदानी पोर्ट्स अँड सेझ लिमिटेड (एपीएसईझेड) कडून १०० कोटी रुपयांचं काम मिळालं आहे. त्याअंतर्गत धामरा बंदरात रेल्वे परिचालन व देखभाल सेवा पुरविण्यासाठी लेटर ऑफ अॅवॉर्ड (एलओए) प्राप्त झालं आहे. जीएसटी वगळता सुमारे १०० कोटी रुपये किमतीची ही ऑर्डर ५ वर्षांत पूर्ण करायची आहे.

दिल्ली मेट्रोसाठी करणार काम

यापूर्वी राइट्स लिमिटेडच्या नेतृत्वाखालील कंसोर्टियम दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या निविदेत सर्वात कमी बोली लावणारा ठरला होता. त्यासाठी ८७.५८ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं डीएमआरसीच्या आरएस-१ गाड्यांमध्ये रेट्रोफिट कामासाठी काढलेल्या निविदेमध्ये राइट्स कंसोर्टियम सर्वात कमी बोली लावणारा (एल-१) ठरला आहे. जीएसटीसह एकूण निविदा किमतीत राइट्सचा वाटा ४९ टक्के म्हणजेच ४२.९१ कोटी रुपये होता. हे कन्सोर्टियम तीन वर्षांच्या आत पूर्ण होणे आवश्यक आहे, असं राईट्सनं म्हटलं.

बोनस शेअर देणार

अलीकडेच राइट्स लिमिटेडनं पात्र भागधारकांसाठी १:१ बोनस समभाग वाटप आणि प्रति शेअर ५ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला. सार्वजनिक उपक्रमांच्या शेअरच्या किंमतीत यंदा ४५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. शुक्रवारी बीएसईवर राइट्स लिमिटेडचा शेअर ७.७० रुपये म्हणजेच २.११ टक्क्यांनी घसरून ३५७.७० रुपयांवर बंद झाला.

कंपनी योजना

राइट्स लिमिटेडनं आयटी आणि एआयवर लक्ष केंद्रित केलेल्या अनेक उपायांसह भविष्यासाठी तयार कंपनी बनण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. रेल्वे मंत्रालयांतर्गत येणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर, कन्सल्टन्सी आणि इंजिनीअरिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राहुल मित्तल यांनी ही माहिती दिली. गेल्या पाच दशकांत कंपनीनं उत्तम कामगिरी करत नवरत्नचा दर्जा मिळवला आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रेल्वेअदानी