शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. तर असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचं नुकसान केलंय. पण अभ्यासपूर्वक यात गुंतवणूक केली तर नफा निश्चितच मिळतो. जवळपास 3 वर्षांपूर्वी, 27 मार्च 2020 रोजी टीडी पॉवर सिस्टमचे शेअर्स 15.40 रुपयांच्या पातळीवर होते. त्यावेळी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचं भांडवल 16 पटीनं वाढलं आहे. मंगळवारच्या ट्रेडिंगमध्ये टीडी पॉवर सिस्टम्सच्या शेअर्सनं 240 रुपयांची पातळी ओलांडली. पॉवर सेक्टर कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांची भावना थोडीशी कमकुवत आहे, परंतु शेअर बाजाराच्या तेजीच्या दरम्यान टीडी पॉवर सिस्टम्सच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे.
इलेक्ट्रिकल उपकरणे बनवणाऱ्या टीडी पॉवर सिस्टीम्सच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांत म्युच्युअल फंडांचं स्वारस्य वाढलं आहे. एलआयसी म्युच्युअल फंड आणि क्वांट म्युच्युअल फंड, तसंच इतर अनेक म्युच्युअल फंडांनी टीडी पॉवर सिस्टम्सचं शेअर्स आक्रमकपणे खरेदी करण्यास सुरुवात केल्याचं दिसून येतंय. टीडी पॉवर सिस्टीमच्या शेअर्सचा 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी ₹250 आहे. कंपनीने या वर्षी गुंतवणूकदारांना 90 टक्के परतावा दिलाय. तर या शेअरनं मागील एका वर्षात 150 टक्के परतावा दिला आहे.
उत्कृष्ट कामगिरी
टीडी पॉवरच्या शेअर्सची मार्च तिमाहीमध्ये कामगिरी उत्कृष्ट होती. कंपनीच्या व्यवहारांत 10 टक्क्यांची वाढ झाली असून ती 250 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत TD पॉवरचा निव्वळ नफा 44 टक्क्यांनी वाढला आहे आणि तो 35 कोटी रुपयांच्या पुढे गेलाय.
रेल्वेकडूनही ऑर्डर
टीडी पॉवर सिस्टीम्स लिमिटेडची सुरूवात 1999 मध्ये झाली. एसी जनरेटर उत्पादनात कंपनी ग्लोबल लीडर आहे. कंपनी प्राइम मूव्हर्स, स्टीम टर्बाइन, गॅस टर्बाइन, हायड्रो टर्बाइन्स, पवन टर्बाइन आणि डिझेल इंजिन 1 MW ते 200 MW पर्यंतचे उत्पादन करते. कंपनीची ऑर्डर बुक मजबूत असून तिला रेल्वेकडूनही मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत.
टीडी पॉवर सिस्टमचे शेअर्स सध्या ₹240 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. 2 वर्षांपूर्वी 6 ऑगस्ट 2021 रोजी कंपनीचे शेअर्स 38 रुपयांच्या पातळीवर होते. तेव्हापासून आतापर्यंत गुंतवणूकदारांचं भांडवल 6 पटीनं वाढलं आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)