भारतीय शेअर बाजार सातत्याने नव-नवे विक्रम नोंदवताना दिसत आहे. आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी अर्थात गुरुवारी बाजार खुला होताच सेन्सेक्स आणि निफ्टीने आपले मागील सर्व विक्रम मोडले. जबरदस्त तेजीसह सुरुवात करून, बीएसई सेन्सेक्स 77,145.46 या नव्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. तर एनएसई निफ्टीही जोरदार तेजीसह 23,481.05 या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे.
बाजार खुला होताच Sensex नं घेतली 400 अंकांची उसळी -
शेअर बाजारात गुरुवारी हिरव्या निशाणापासून व्यवहाराला सुरुवात झाली आणि सेन्सेक्स जवळपास 400 अंकांनी वाढून 77145.46 वर उघडला. तर दुसरीकडे, सेन्सेक्सप्रमाणेच, जबरदस्त तेजी सह, NSE निफ्टी 118.35 अंकांनी अथवा 0.51% ने वाढून 23,441.30 वर उघडला आणि काही मिनिटांतच 23,481 वर पोहोचला.
या दोन बातम्यांमुळे बाजारात तेजी -
शेअर बाजारात ही तेजी दोन बातम्यांमुळे आल्याचे मानले जात आहे. खरे तर, अमेरिकेत होणाऱ्या कुठल्याही घटनेचा प्रभाव भारतीय बाजारांवरही होत असतो. यूएस पॉलिसी रेटसंदर्भात यूएस फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा परिणाम आज शेअर बाजारावरही बघायला मिळाला. यूएस फेडने त्यांचे व्याजदर स्थिर ठेवले आहेत. अर्थात ते 5.25 ते 5.50 टक्क्यांवर स्थिर आहेत.
दुसरी आनंदाची बातमी म्हणजे, देशातील महागाई दरात मोठी घसरण झाली असून ती 12 महिन्यांतील नीचांकी पातळीवर आली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, वार्षिक आधारावर भारतातील किरकोळ महागाई मे महिन्यात कमी होऊन 4.75 टक्क्यांनी आली आहे. ही गेल्या 12 महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर 4.83% होता. महागाईसंदर्भातील हा डेटा बहुतांश अर्थतज्ज्ञांच्या अंदाजापेक्षाही कमी आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)