Ola Electric share price: काही दिवसांपूर्वीच शेअर बाजारात दाखल झालेल्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीनं आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. ओलाच्या शेअरनं आज २० टक्क्यांचा उच्चांकी स्तर गाठला आहे. हा शेअर १०९.४४ रुपयांवर पोहोचला. सलग दुसऱ्या दिवशी ओलाच्या शेअरमध्ये ही तेजी कायम राहिली. यापूर्वी ९ ऑगस्ट रोजी पहिल्यांदा अप्पर सर्किट लागल्यानंतर शेअरमद्ये २० टक्के वाढ झाली होती.
सकाळच्या सत्रात सकाळी १४० दशलक्ष शेअर्सचे व्यवहार झाले, जे ९ ऑगस्ट रोजी ५७० दशलक्ष शेअर्सच्या तुलनेत कमी होते. कंपनीने १ ऑगस्ट रोजी अँकर गुंतवणूकदारांकडून २,७६३ कोटी रुपये गोळा केले. देशांतर्गत म्युच्युअल फंड, देशांतर्गत जीवन विमा कंपन्या आणि परदेशी फंड अँकर अलॉटमेंटचा भाग होते.
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, भाविश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील कंपनी १४ ऑगस्ट रोजी पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी १४ ऑगस्ट २०२४ रोजी लिस्टिंग नंतर पहिली बोर्ड बैठक घेणार आहे.
१५ ऑगस्टला बाईक येणार
ओला इलेक्ट्रिक देखील आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटारसायकलसाठी सज्ज झाली आहे. स्वातंत्र्यदिनी कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करेल. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी इलेक्ट्रिक बाईक उत्पादक कंपनी गेल्या काही काळापासून इलेक्ट्रिक मोटारसायकल विकसित करत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ओलानं डायमंडहेड, अॅडव्हेंचर, रोडस्टर आणि क्रूझर अशी चार मॉडेल्स लॉन्च केली होती.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)