Anil Ambani Reliance Power : अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स सध्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. रिलायन्स पॉवरचा शेअर गुरुवारी ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह ३७.९७ रुपयांवर पोहोचला. ५ दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये २४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअरनं गुरुवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या साडेचार वर्षांत ३२०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १५.५३ रुपये आहे.
अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर या कंपनीच्या शेअर्सनं गेल्या साडेचार वर्षांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. रिलायन्स पॉवरचा शेअर २७ मार्च २०२० रोजी १.१३ रुपयांवर होता. २२ ऑगस्ट २०२४ रोजी कंपनीचा शेअर ३७.९७ रुपयांवर पोहोचला आहे. जर एखाद्या व्यक्तीनं २७ मार्च २०२० रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि अद्याप रिलायन्स पॉवरचे शेअर्स विकले नसते तर या शेअर्सची सध्याची किंमत ३३.६० लाख रुपये झाली असती.
वर्षभरात ११५ टक्क्यांची वाढ
रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ११५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २२ ऑगस्ट २०२३ रोजी कंपनीचा शेअर १७.३९ रुपयांवर होता. रिलायन्स पॉवरचा शेअर २२ ऑगस्ट २०२४ रोजी ३७.९७ रुपयांवर पोहोचलाय. तर, या वर्षी आतापर्यंत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये ५५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अदानी पॉवरसह चर्चा
अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवर मोठ्या करारासाठी बोलणी करत आहे. अदानी पॉवरनं ६०० मेगावॅटचा बुटीबोरी औष्णिक वीज प्रकल्प खरेदी करण्यासाठी बोलणी सुरू केली आहेत. हा प्रकल्प एकेकाळी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरच्या मालकीचा होता. मिंटच्या रिपोर्टमध्ये या प्रकरणाची माहिती असलेल्या दोन व्यक्तींनी ही माहिती दिली आहे. हा करार २४०० ते ३००० कोटी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका व्यक्तीनं नाव न छापण्याच्या अटीवर दिली. हा करार प्रति मेगावॅट ४ ते ५ कोटी रुपये इतका होण्याची शक्यता आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)