लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अमेरिकेतील दाेन बँका बंद पडल्याचा परिणाम भारतातील शेअर बाजारावर झाला. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार काेसळला. सेन्सेक्सने ९०० अंकांनी गटांगळी खाल्ली, तर निफ्टीदेखील २५८ अंकांनी काेसळला. बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये माेठी घसरण झाली. एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे ४ लाख काेटी रुपये बुडाले.
सेन्सेक्स ५८,२३७ वर, तर निफ्टी १७,१५५ अंकांवर बंद झाले. दाेन्ही निर्देशांक पाच महिन्यांच्या निचांकी पातळीवर आले. शेअर बाजार सुरू झाला त्यावेळी दाेन्ही निर्देशांक वधारले हाेते. मात्र, अमेरिकेत दुसरी बँक बुडाल्याची बातमी धडकताच बाजार काेसळला. बँका, वाहन उद्याेग, धातू आदी क्षेत्रांत माेठी घसरण झाली.
जगभरातील बाजारांवर परिणाम
- २००८नंतर आता अमेरिकेतील बँका बुडाल्यानंतर गुंतवणूकदार चिंतेत आहेत. याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसला. - जपानसह युराेपमधील बहुतांश शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. तर चीन, हाँगकाँग आणि दक्षिण कोरियाचे बाजार वधारले.
४.४३ लाख काेटींचा बसला फटका
- अमेरिकेतील बॅंकिंग संकटामुळे तसेच पुन्हा व्याजदर वाढीच्या भीतीने माेठ्या प्रमाणात विक्री झाली. सुरुवातीला सुमारे ३७५ अंकांनी वधारलेला सेन्सेक्स काेसळला. एकाच दिवसात सेन्सेक्समध्ये सुमारे १,४०० अंकांची हालचाल दिसून आली. परिणामी गुंतवणूकदारांचे ४.४३ लाख काेटी बुडाले. - अमेरिकन सरकारने दाेन्ही बॅंकांच्या ठेवीदारांना आश्वस्त केले, तरीही तेथील शेअर बाजारांमध्ये साेमवारी सुरूवातीला घसरण झाली.
नेतृत्व बदल झाल्यामुळे टेक महिंद्राचे शेअर्स वधारले. तसेच अदानी समूहातील चार कंपन्यांचे शेअर्स अप्पर सर्किट लागून बंद झाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"