सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत हेव्ही इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या (BHEL) शेअर्समध्ये सोमवारी मोठी तेजी दिसून आली. कंपनीचे शेअर्स कामकाजाच्या सुरुवातीला २ टक्क्यांच्या वाढीसह ९९.९० रुपयांवर पोहोचले. एका वृत्तानंतर कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी दिसून आली. दरम्यान, कंपनीला अदानी पॉवरच्या एका युनिटकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे.
४ हजार कोटींची ऑर्डर
BHEL ने मध्य प्रदेशातील वीज प्रकल्पासाठी अदानी पॉवरच्या पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या महान एनर्जीन लिमिटेडकडून ४,००० कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली आहे. आदेशानुसार, बीएचईएल मध्य प्रदेशातील बांदुरा येथे असलेल्या महान एनर्जी लिमिटेडच्या २x८०० मेगावॅट वीज प्रकल्पाचे बॉयलर, टर्बाइन, जनरेटर, उभारणी आणि कमिशनिंग यासारखी उपकरणे पुरवेल. ही ऑर्डर ३१-३५ महिन्यांत पूर्ण केली जाईल, असं बीएचईएलनं स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. टर्बाइन जनरेटर बीएचईएलच्या त्रिची आणि हरिद्वार प्लांटमध्ये तयार केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
१७ टक्क्यांची तेजी
२०२२-२३ मध्ये कंपनीला मिळालेल्या नवीन ऑर्डरमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १७ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे. या आर्थिक वर्षात कंपनीकडे एकूण २३,५४८ कोटी रुपयांची ऑर्डर बुक आहे. २०२१-२२ मध्ये, बीएचईएलनं २०,०७८ कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर मिळवल्या होत्या.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)