Join us

२ महिन्यांत ५०० टक्क्यांची तेजी, ३२ रुपयांवरून १९५ रुपयांवर पोहोचला सरकारी कंपनीचा शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2024 9:49 AM

सरकारी कंपनीच्या शेअर्सनं अवघ्या 2 महिन्यांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे.

सरकारी कंपनी इरेडाच्या (IREDA) शेअर्सनं अवघ्या 2 महिन्यांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. इरेडाचा आयपीओ 2 महिन्यांपूर्वी 32 रुपये किमतीत आला होता. कंपनीच्या शेअर्सनं आता 195 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. इरेडाचे शेअर्स त्यांच्या इश्यू प्राईजपेक्षा जवळपास 500 टक्क्यांनी वाढले आहेत. सरकारी कंपनी इरेडाचे शेअर्स आणखी वाढू शकतात, असं बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कंपनीचे शेअर्स येत्या काही महिन्यांत २४० रुपयांची पातळी गाठू शकतात, असं तज्ज्ञांनी म्हटलंय. 

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडच्या (IREDA) आयपीओची किंमत 30 ते 32 रुपये होती. कंपनीचा आयपीओ 21 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. इरेडाच्या शेअर्सचं 32 रुपयांना वाटप करण्यात आलं होतं. त्यानंतर कंपनीचे शेअर्स 29 नोव्हेंबर रोजी 50 रुपयांवर लिस्टेड झाले होते. लिस्टिंग झाल्यापासून, इरेडाच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे आणि आता कंपनीचे शेअर्स 195.05 रुपयांवर पोहोचले आहेत. इरेडाचे शेअर्स मुंबई शेअर बाजारावर आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज यादोन्ही प्लॅटफॉर्मवर लिस्टेड आहेत. 

240 रुपयांपर्यंत जाईल शेअर 

जीसीएल ब्रोकिंगचे रिसर्च अॅनालिसिस्ट वैभव कौशिक सांगतात की, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत 1 कोटी घरांमध्ये रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यात येणार आहेत. इरेडाला या प्रकल्पाचा नक्कीच फायदा होईल. सरकारी कंपनी इरेडाचे शेअर्स येत्या काही महिन्यांत 240 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. 139 रुपयांवर स्टॉप लॉस राखणं महत्त्वाचं आहे. बिझनेस टुडेच्या रिपोर्टमध्ये कौशिक यांनी ही माहिती दिली आहे. इरेडाचा आयपीओ एकूण 38.80 पट सबस्क्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 7.73 पट सबस्क्राइब झाला. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कमगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील ब्रोकरेजची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारशेअर बाजार