Join us  

६०० टक्क्यांनी वधारला 'हा' छोटा शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केलेत १२०००००० शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 2:23 PM

Patel Engineering share : या शेअरमध्ये ६०० टक्क्यांहून अधिक वधारला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स ८ रुपयांवरून ६० रुपयांपर्यंत आले आहेत. 

स्मॉलकॅप कंपनी पटेल इंजिनीअरिंगच्या शेअर्समध्ये (Patel Engineering share) प्रचंड वाढ झाली आहे. सोमवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ६०.७१ रुपयांवर पोहोचला. पटेल इंजिनीअरिंगचा शेअर गेल्या साडेचार वर्षांत ६०० टक्क्यांहून अधिक वधारला आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स ८ रुपयांवरून ६० रुपयांपर्यंत आले आहेत. 

पटेल इंजिनीअरिंगने नुकताच रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) सोबत करार केला आहे. या सामंजस्य करारानुसार दोन्ही कंपन्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील हायड्रो, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांसाठी एकत्रित बोली लावणार आहेत. दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांचा पटेल इंजिनीअरिंगमध्ये मोठी गुंतवणूक आहे.

साडेचार वर्षात ६०० टक्क्यांची वाढ

स्मॉलकॅप कंपनी पटेल इंजिनीअरिंगच्या शेअरमध्ये गेल्या साडेचार वर्षांत ६०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. २७ मार्च २०२० रोजी कंपनीचा शेअर ८.५१ रुपयांवर होता. पटेल इंजिनीअरिंगचा शेअर २ सप्टेंबर २०२४ रोजी ६०.७१ रुपयांवर पोहोचला. गेल्या ३ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ३२० टक्क्यांची वाढ झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स १४.३३ रुपयांवरून ६० रुपयांवर पोहोचले. गेल्या २ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये १५० टक्क्यांची वाढ झाली आहे. पटेल इंजिनीअरिंगचा शेअर ७२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तर ७९ रुपये तर, ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ४१.९९ रुपये आहे.

विजय केडियांची मोठी गुंतवणूक

दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी पटेल इंजिनीअरिंगवर मोठी गुंतवणूक केलीये. विजय केडिया यांनी केडिया सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून पटेल इंजिनीअरिंगमध्ये गुंतवणूक केली. त्यांच्याकडे पटेल इंजिनीअरिंगचे १२,०००,००० शेअर्स म्हणजेच कंपनीत १.४२ टक्के हिस्सा आहे. म्युच्युअल फंडांबद्दल बोलायचे झाले तर जेएम फायनान्शियल म्युच्युअल फंडाकजे (जेएम फ्लेक्सीकॅप फंड) कंपनीचे ८८२५५१६ शेअर्स आहेत. पटेल इंजिनीअरिंगचे मार्केट कॅप २९७० कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचलंय.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक