जर तुम्हाला आयपीओमध्ये (IPO) गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या आठवड्यात ७ कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. यामध्ये ड्रोन कंपनीपासून ते आयटी फर्मपर्यंतचा समावेश आहे. या सर्व कंपन्या बाजारातून १६०० कोटींहून अधिक रक्कम उभारण्याचा विचार करत आहेत. यापूर्वीही अनेक कंपन्यांनी त्यांचे आयपीओ आणले होते. यापैकी काही आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना बंपर नफाही मिळाला. या आठवड्यात कोणत्या कंपन्या त्यांचे आयपीओ घेऊन बाजारात येणार आहेत ते पाहू.
या कंपन्यांचे येणार आयपीओ
या आठवड्यात येणारा पहिला आयपीओ हा ड्रोन तयार करणारी कंपनी आयडियाफोर्जचा (IdeaForge) असेल. हा आयपीओ आज म्हणजेच २६ जून रोजी उघडेल. २९ जूनपर्यंत गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीचे शेअर्स ७ जुलै रोजी शेअर बाजारात लिस्ट होतील. आयटी सर्व्हिस फर्म Cyient ची उपकंपनी असलेल्या Cyient DLM चा आयपीओ २७ जून रोजी उघडेल. हा आयपीओ ३० जून रोजी बंद होईल. याचा प्राईज बँड २५०-२६५ रुपये प्रति शेअर आहे. कंपनी बाजारातून सुमारे ५९२ कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. बांधकाम आणि विकास कंपनी पीकेएच व्हेन्चर्सचा आयपीओदेखील पुढील आठवड्यात उघडेल. IPO साठी बोली ३० जून रोजी सुरू होईल. हा आयपीओ ४ जुलै रोजी बंद होईल. कंपनीनं याचा प्राईज बँड जारी केलेला नाही.
एसएमई सेगमेंटचा पहिला आयपीओ
याशिवाय कन्व्हेयर बेल्ट बनवणाऱ्या पेंटागॉन रबरचा आयपीओ २६ जून रोजी उघडेल. एसएमई विभागातील हा पहिला आयपीओ असेल. हा आयपीओ ३० जून रोजी बंद होईल. यासाठी प्रति शेअर ६५-७० रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. एसएमई विभागातील दुसरा आयपीओ ग्लोबल पेट इंडस्ट्रीजचा आहे. हा आयपीओ २९ जून रोजी बोलीसाठी खुला होईल. त्यात ३ जुलैपर्यंत गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतील. यासाठी ४९ रुपये प्रति शेअर किंमत निश्चित करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटशी संबंधित सेवा पुरवणाऱ्या त्रिध्या टेक या कंपनीचा आयपीओही पुढील आठवड्यात बोलीसाठी खुला होईल. कंपनीने आपल्या आयपीओसाठी ३५ ते ४२ रुपये प्रति शेअरची प्राईस बँड निश्चित केलीये.
आयटी सर्व्हिसेस कंपनी सिनोपिक्स टेक्नॉलॉजीजचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला होणार आहे. कंपनीनं यासाठी २३७ रुपये प्रति शेअर इतकी किंमत निश्चित केली आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)