Sensex-Nifty Crashed: इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे जगभरातील शेअर बाजारांना फटका बसला आहे. देशांतर्गत शेअर बाजाराचीही स्थिती चांगली नाही आणि इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. निफ्टीचे सर्व निर्देशांक रेड झोनमध्ये आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्रीचा दबाव आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज ९.५२ लाख कोटी रुपयांनी घसरलं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ९.५२ लाख कोटी रुपयांची घट झाली.
आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या १२३१.९८ अंकांनी म्हणजेच १.५२ टक्क्यांनी घसरून ७९,७४९.९७ वर आणि निफ्टी ५० ३९३.२५ अंकांनी म्हणजेच १.५९ टक्क्यांनी घसरून २४,३२४.४५ वर बंद आला. शुक्रवारी सेन्सेक्स ८०,९८१.९५ वर आणि निफ्टी २४,७१७.७० वर बंद झाला होता.
९.५२ लाख कोटींचा फटका
२ ऑगस्ट २०२४ रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व शेअर्सचं एकूण मार्केट कॅप ४,५७,१६,९४६.१३ कोटी रुपये होतं. आज ५ ऑगस्ट २०२४ रोजी बाजार उघडताच ते ४,४७,६४,६९२.६५ कोटी रुपयांवर आलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ९,५२,२५३.४८ कोटी रुपयांची घट झाली आहे.
सेन्सेक्सचे सर्व शेअर्स लालसेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी एकही शेअर ग्रीन झोनमध्ये नाही. सर्वात मोठी घसरण मारुती, टाटा मोटर्स आणि टायटनमध्ये झाली आहे. टेक महिंद्रा, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअरमध्येही मोठी घसरण दिसून आली.