Join us

९ लाख काेटींनी गुंतवणूकदार श्रीमंत; सेन्सेक्स प्रथमच ६५,००० अंकांवर, आठवड्याची सुरुवात तेजीने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 8:36 AM

सेन्सेक्सने महिनाभरात २,३०० अंकांची उसळी घेतली आहे.

मुंबई : शेअर बाजारातील तेजी नव्या आठवड्यातही कायम आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला.  सेन्सेक्सने  ४८६ अंकांची उसळी घेत प्रथमच ६५ हजारांचा टप्पा गाठला. सेन्सेक्स ६५,२०५.०५ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १३३.५० अंकांनी वधारून १९,३२२.५५ वर बंद झाला.

सेन्सेक्सने महिनाभरात २,३०० अंकांची उसळी घेतली आहे. तर गेल्या आठवडाभरातच सेन्सेक्स तब्बल २,२३५ अंकांनी वधारला आहे. शेअर बाजारातील तेजी सलग पाचव्या ट्रेडिंग सत्रात कायम राहिली आहे. रविवारी जून महिन्यातील जीएसटी संकलनाचा आकडा जाहीर झाला. जूनमध्येही संकलन दीड लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याचाही परिणाम दिसला. 

तेजीचे कारण काय?शेअर बाजारला उच्चांकी पातळीवर पाेहाेचविण्यामागे दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये माेठ्या प्रमाणात झालेली खरेदी आणि परकीय संस्थांनी केलेली माेठ्या प्रमाणात गुंतवणूक, ही दाेन प्रमुख कारणे आहेत. धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी आहे. तसेच एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांचे विलीनीकरण झाले. त्यामुळे या शेअर्समध्येही तेजी आली आहे. अमेरिकेतील बाजारातही उत्साहाचे वातावरण आहे. तेथे महागाई कमी हाेत असल्यामुळे फेडरल रिझर्व्हनेही सकारात्मक संकेत दिले आहेत.

टॅग्स :शेअर बाजार