Join us

९९६ कोटी रुपयांचा नफा, १८% टक्क्यांपर्यंत वधारले पॉवर कंपनीचे शेअर्स; वर्षभरात १८०% टक्क्यांची तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 4:36 PM

शेअर बाजारात बुधवारी या कंपनीचा शेअर १६ टक्क्यांनी वधारून १,८६५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सने बुधवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला.

टोरंट ग्रुपची कंपनी टोरंट पॉवरच्या शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून आली. शेअर बाजारात बुधवारी टोरंट पॉवरचा शेअर १६ टक्क्यांनी वधारून १,८६५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सने बुधवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. टोरंट पॉवरचा शेअर मंगळवारी १५९९.६५ रुपयांवर बंद झाला होता. उत्तम तिमाही निकालानंतर टोरंट पॉवरच्या शेअर्समध्ये ही तेजी आली. टोरंट पॉवरच्या शेअरचा ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर ६२० रुपये आहे.

जून २०२४ तिमाहीत टोरंट पॉवरने दमदार नफा कमावला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ८७.२ टक्क्यांनी वाढून ९९६.३ कोटी रुपये झाला आहे. जून २०२४ तिमाहीत कंपनीचा महसूल २३.३ टक्क्यांनी वाढून ९०३३.७ कोटी रुपये झाला आहे. ऑपरेटिंग लेव्हलवर टोरंट पॉवरचा एबिटडा सुमारे ५७ टक्क्यांनी वाढून १८५७.९ कोटी रुपये झाला. त्याचवेळी कंपनीचा एबिटा मार्जिन गेल्या वर्षीच्या जून तिमाहीतील १६.२ टक्क्यांवरून २०.६ टक्क्यांवर पोहोचला आहे. टोरंट इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे (टीईपीएल) १०० टक्के शेअर्स टोरेंट इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडला ८५ कोटी रुपयांना विकण्यास टोरंट पॉवरच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.

गेल्या वर्षभरात कंपनीचा शेअर १८० टक्क्यांनी वधारला आहे. ३१ जुलै २०२३ रोजी कंपनीचा शेअर ६७६.५० रुपयांवर होता. टोरंट पॉवरचा शेअर ३१ जुलै २०२४ रोजी १८६५ रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षी आतापर्यंत टोरंट पॉवरचे शेअर ९८ टक्क्यांनी वधारले आहेत. १ जानेवारी २०२४ रोजी या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर ९४२.२५ रुपयांवर होता. गेल्या ६ महिन्यांत टोरंट पॉवरच्या शेअरमध्ये ८० टक्क्यांची वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक