Join us

शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 10:07 AM

Share Market Opening : आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि निफ्टी ११७ अंकांच्या घसरणीसह २६०६१ च्या पातळीवर उघडला.

आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि निफ्टी ११७ अंकांच्या घसरणीसह २६०६१ च्या पातळीवर उघडला. तर सेन्सेक्सही ३६३ अंकांनी घसरून ८५२०९ च्या पातळीवर उघडला. इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाबाबत बाजारात चिंता व्यक्त केली जात आहे, ज्याच्या प्रभावामुळे बाजारात लवकर विक्रीचा दबाव दिसून येत आहे.

सुरुवातीच्या व्यवहारात हिंडाल्को, एलटीआय माइंडट्री, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे, तर हीरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा या शेअर्समध्ये विक्री दिसून येत आहे.

निफ्टी सपोर्ट लेव्हलवर

गेल्या आठवड्यात निफ्टीनं २६२७७ ची उच्चांकी पातळी पाहिली. यानंतर त्यात सातत्यानं विक्रीचा दबाव दिसून येत आहे. तांत्रिक दृष्टीने निफ्टीमध्ये तीन महत्त्वाचे सपोर्ट लेव्हल आहेत, जिथून रिअॅक्शन पाहता येते. निफ्टीची ही लेव्हल २६०००, २५९०० आणि २५८०० आहे. निफ्टीमध्ये इमिजिएट सपोर्ट लेव्हल २५,९०० च्या लेव्हलवर आहे. बाजारात पुढच्या काही सेशन्समध्ये कन्सोलिडेशनंतर निफ्टीत तेजी पाहायला मिळू शकते, असं एचडीएफसी सिक्युरिटीजचे नागराज शेट्टी म्हणाले. 

अमेरिकन बाजारात तेजी

फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या अपेक्षेला आणखी बळ मिळाल्यानं ब्लू-चिप डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज विक्रमी उच्चांकी पातळीवर बंद झाल्यानं अमेरिकन शेअर्समध्ये तेजी आली. यामुळे स्मॉल कॅप शेअर्सनाही चालना मिळाली आणि वॉल स्ट्रीटच्या तीन मुख्य निर्देशांकांनी साप्ताहिक वाढ नोंदविली. तर दुसरीकडे जपानच्या शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. निवडणुकीनंतर मध्यवर्ती बँकेच्या व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्यानं जपानच्या शेअर बाजारात सोमवारी घसरण झाली.

टॅग्स :शेअर बाजार