बँक ऑफ महाराष्ट्रचा (Bank of Maharashtra Ltd) शेअर सोमवारी फोकसमध्ये होता. या शेअरमध्ये इंट्रा डेमध्ये 7% हून अधिकची तेजी आली असून तो 69.69 रुपयांवप पोहोचला आहे. या तेजीचे कारण म्हणजे, जून तिमाहीतील जबरदस्त परिणाम.
पब्लिक सेक्टरमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील नेट प्रॉफिट 47 टक्क्यांनी वाढून 1,293 कोटी रुपयांवर पोहचला आहे. अनुत्पादित मालमत्तेत (एनपीए) कमी तथा व्याज उत्पन्नात झालेल्या वाढीमुळे बँकेचा नफा वाढला आहे. पुण्याच्या या बँकेने 2023-24 च्या एप्रिल-जून तिमाहीमध्ये 882 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट कमावला आहे.
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत बँकेने म्हटले आहे की, तिमाहीदरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 6,769 कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या वर्षात याच तिमाहीत 5,417 कोटी रुपये होते. तिमाहीदरम्यान बँकेला व्याजातून मिळालेले उत्पन्न 4,789 कोटी रुपयांनी वाढून 5,875 कोटी रुपयांवर पोहोचले. समीक्षाधीन कालावधीत, बँकेचा सकल NPA एकूण कर्जाच्या 1.85 टक्क्यांवर आला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 2.28 टक्के होता. तसेच, बँकेचा शुद्ध एनपीए देखील 0.24 टक्क्यांनी घसरून 0.20 टक्के राहिला. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण 18.07 टक्क्यांवरून घसरून 17.04 टक्क्यांवर आले आहे.
अशी आहे शेअरची स्थिती -
बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा देत आहे. पीएसयू बँकच्या शेअरमध्ये गेल्या पाच दिवसांत 10% आणि सहा महिन्यांत 40% पर्यंतची तेजी आली आहे. हा शेअर या वर्षात YTD मध्ये 50% टक्क्यांनी वधारला आहे. वर्षभराचा विचार करता, या शेअरने वर्षभरात 120% पर्यंतचा परतावा दिला आहे. तसेच पाच वर्षात 370% टक्क्यांचा परतावा दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 73.50 रुपये तर नीचांक 29.86 रुपये आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या मार्केट कॅपचा विचार करता, ते 48,684.44 कोटी रुपयांवर पोहोचे आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)