Suzlon Energy Share Price : विंड टर्बाइन उत्पादक सुझलॉन एनर्जीला मोठा धक्का बसलाय. सोमवारी बाजार उघडताच सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये घसरण झाली. सोमवारी मुंबई शेअर बाजारात सुझलॉन एनर्जीचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून ४७.३५ रुपयांवर आला. राजीनाम्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण झाली. सुझलॉन एनर्जीचे स्वतंत्र संचालक मार्क डेडलर यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे. दरम्यान, ब्रोकरेज कंपनी नुवामानं सुझलॉन एनर्जीवर 'बाय' रेटिंग दिले असून या शेअरची टार्गेट प्राइस ५३ रुपये आहे.
काय म्हटलं राजीनाम्यात?
"गेल्या १८ महिन्यांतील सुझलॉनच्या ऑपरेशनल आणि आर्थिक कामगिरीबद्दल आपण खूप आनंदी आहोत, परंतु अशा अनेक परिस्थिती आहेत जिथे कॉर्पोरेट गव्हर्नन्स मानकं आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत," असं सुझलॉन समूहाचे अध्यक्ष विनोद तांती यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात स्वतंत्र संचालक मार्क यांनी नमूद केलंय. कंपनीच्या स्वतंत्र संचालकांनी उचललेले मुद्दे हे अतिशय सौम्य आणि प्रोसेस ओरिएंटेड आहेत, असं ब्रोकरेज हाऊस नुवामानं म्हटलं. नुवामानं यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस सुझलॉन एनर्जीचं कव्हरेज सुरू केलंय.
वर्षभरात २०० टक्क्यांची वाढ
गेल्या वर्षभरात सुझलॉन एनर्जीच्या (Suzlon Energy) शेअरमध्ये २१० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. विंड टर्बाइन बनवणाऱ्या सुझलॉन एनर्जी या कंपनीचा शेअर १२ जून २०२३ रोजी १५.२९ रुपयांवर होता. १० जून २०२४ रोजी कंपनीचा शेअर ४७.३५ रुपयांवर पोहोचला आहे. तर गेल्या ३ वर्षात सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्ये ६२५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ११ जून २०२१ रोजी कंपनीचा शेअर ६.५४ रुपयांवर होता. सुझलॉन एनर्जीचा शेअर १० जून २०२४ रोजी ४७.३५ रुपयांवर पोहोचला. कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांकी स्तर ५२.१९ रुपये आहे. तर सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १३.२१ रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)