Adani Wimar News: खाद्यतेल विकणारी कंपनी फॉर्च्युन ब्रँड अदानी विल्मर लिमिटेडा आहे. ही कंपनी पीठ, तांदूळ, बेसन, सत्तूची विक्री करते. आता या कंपनीनं दिल्लीतील लोणचं विकणारी कंपनी जीडी फुड्सच्या खरेदीचा करार केलाय. पाहूया संपूर्ण माहिती. अदानी विल्मर लिमिटेड कंपनी जीडी फूड्स मॅन्युफॅक्चरिंग (इंडिया) विकत घेणार आहे. जीडी फूड्स 'टॉप्स' या ब्रँड नावानं सॉस, लोणचं आणि चटणी तयार करते. दिल्लीतील या कंपनीचं मूल्यांकन ६०३ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
हा करार काही टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात अदानी विल्मर ८० टक्के हिस्सा खरेदी करणार असून पुढील तीन वर्षांत २० टक्के हिस्सा खरेदी केला जाणार आहे. जीडी फूड्सच्या शेअरची किंमत ६०३ कोटी रुपये निश्चित करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ४८३ कोटी रुपये दिले जाणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, अदानी विल्मरनं, हे पाऊल त्यांच्या रणनीतीचा एक भाग आहे, कंपनीला विविध मूल्यवर्धित खाद्य उत्पादनांमध्ये प्रवेश करायचा आहे. यामुळे कंपनीच्या नफ्यातही वाढ होणार असल्याचं म्हटलं. टोमॅटो केचप आणि लोणच्याच्या बाबतीत टॉप्स ब्रँड देशातील टॉप ३ ब्रँडपैकी एक आहे. २०२३-२४ मध्ये जीडी फूड्सनं ३८६ कोटी रुपये आणि एबिटडा ३२ कोटी रुपये कमावले होते.
अदानी विल्मरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु मल्लिक यांनी बाजार बदलत असल्यानं विश्वासार्ह राष्ट्रीय एफएमसीजी ब्रँडची गरज वाढत आहे. या करारामुळे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आठ नव्या उत्पादनांची भर पडणार असल्याचं ते म्हणाले.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)