२४ जानेवारीला आलेल्या हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानींच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं होतं. समूहाच्या अनेक कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात आपटले होते. यानंतर अनेक प्रयत्नांमुळे पुन्हा शेअरमध्ये वाढ होत गेली. तसंच समूहाच्या एका कंपनीवर सर्वांची नजर होती ती म्हणजे अदानी एन्टरप्राईजेस. या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला होता. परंतु हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर नुकसानही तितकंच झालं होतं.
आता अदानी एंटरप्रायझेसचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. तिमाही निकालांमध्ये कंपनीचा एकत्रित नफा दुपटीनं वाढून ७२२ कोटी रुपये झाला आहे. तसंच या कंपनीच्या महसुलात २६ टक्क्यांनी जोरदार वाढ झाली आहे.
गुंतवणूकदार मालामाल
कंपनीच्या उत्कृष्ट तिमाही निकालानंतर कंपनीनं गुंतवणूकदारांना बंपर भेटही दिली आहे. अदानी एंटरप्रायझेसनं कंपनीच्या प्रत्येक शेअरवर १२० टक्क्यांचा लाभांश जाहीर केला आहे. कंपनी तिच्या सर्व गुंतवणूकदारांना प्रति शेअर १.२० रुपये लाभांश देईल. कंपनीच्या निकालानंतर अदानी एंटरप्रायझेसला तर दिलासा मिळाला आहेच, पण ज्या गुंतवणूकदारांनी आपले पैसे कंपनीत गुंतवले आहेत त्यांनाही दिलासा मिळणार आहे.
उत्पन्नही वाढलं
नफ्यासोबतच अदानी एंटरप्रायझेसचे उत्पन्नही वाढलं आहे. या कालावधीत कंपनीचं उत्पन्न २४८६६ कोटी रुपयांवरून ३१३४६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअरमध्येही तेजी दिसून आली. गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ८६ रुपयांच्या वाढीसह १९२५ रुपयांवर बंद झाला.