मुंबई - अब्जाधीश गौतम अदानी यांच्या अदानी समुहानं काढलेला FPO रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केटमधील चढ-उतार पाहता कंपनीच्या संचालक मंडळाने FPO रद्द केला आहे. शेअर बाजारातील चढ-उतार पाहता आपल्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा कंपनीचा उद्देश आहे. त्यामुळेच आम्ही FPO तून मिळालेली रक्कम परत करणार आहोत आणि त्याच्याशी संबंधित व्यवहार समाप्त करणार आहोत अशी माहिती अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी दिली.
बुधवारी अदानी समूहाचे चेअरमन कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत म्हणाले, "आमच्या FPO ला पाठिंबा आणि संधी दिल्याबद्दल सर्व गुंतवणूकदारांचे बोर्ड आभार मानते. FPO मंगळवारी यशस्वीरित्या बंद झाला. गेल्या आठवड्यात स्टॉकमधील अस्थिरता असूनही कंपनी, त्यांचा व्यवसाय आणि त्यांचे व्यवस्थापन तुमचा विश्वास अतिशय आश्वासक आहे असं त्यांनी सांगितले.
एका रिपोर्टमुळे अदानी ग्रुपला फटकाअमेरिकास्थित हिंडेनबर्ग संस्थेने कथित गैरव्यवहारांबाबत अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहाला दिलेल्या दोन लाख कोटींपेक्षा अधिक कर्जाचा बँकांनी आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. हिंडेनबर्ग अहवालामुळे शेअर मार्केटमधील अदानी समूहाचे शेअर सपाटून पडले. याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला असून, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. अदानी एंटरप्रायझेसचा शेअर २८.४५ टक्क्यांनी घसरला आणि ८४६.३० रुपयांच्या तोट्यासह २१२८.७० रुपयांवर बंद झाला. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप ९६,४७८.२९ कोटी रुपयांनी कमी झाले. कंपनीचे मार्केट कॅप एका दिवसापूर्वी ३,३९,१५०.३३ कोटी रुपये होते, ते आज २,४२,६७२.०४ कोटी रुपयांवर आले आहे.
काय असतो FPO?FPO फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणजे कुठल्याही कंपनीसाठी पैसे जमा करण्याची एक पद्धत आहे. जी कंपनी पहिल्यापासून शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असते ती गुंतवणूकदारांना नवे शेअर ऑफर करते. हे शेअर बाजारातील उपलब्ध असणाऱ्या शेअर्सपेक्षा वेगळे असतात.