मुंबई-
हिंडनबर्गच्या मोठ्या धक्क्यानंतर 'अदानी ग्रूप' आता सावरताना दिसत आहे. कारण 'अदानी ग्रूप'पैकी 'अदानी एन्टरप्रायजेस' आणि 'अदानी पावर'च्या शेअर्समध्ये वाढ होत आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहातील कंपन्यांना गटांगळी लागली. पण गेल्या पाच दिवसात अदानी समूह हळूहळू सावरत आहे. ३ फेब्रुवारीला अदानी एन्टरप्रायजेसचा शेअर १०९५ रुपयांपर्यंत कोसळला होता. पण आज कंपनीच्या शेअरनं २ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये गेल्या पाच दिवसात प्रतिशेअर १४९ रुपयांची वाढ झाली आहे.
अदानी समुहासाठी आनंदाची बातमी! अदानींनी केले कमबॅक, रेटिंग एजन्सीने दिली महत्वाची माहिती
'अदानी पावर'चीही सकारात्मक वाटचाल पाहायला मिळत आहे. आज अदानी पावरच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळतेय. अदानी पावरचा प्रतिशेअर आज १८१.९० रुपयांवर व्यवहार करत असून शेअरला अप्पर सर्किट लागले आहे.
रेटिंग एजन्सीच्या सकारात्मक अहवालाचा परिणाम
अदानी समूहाच्या कर्जाबाबत मूडीज आणि फिच या दोन्ही कंपन्यांनी आपले अहवाल दिले आहेत. 'अदानी समूहाच्या कंपन्यांनी भारतीय बँकांकडून घेतलेली कर्जे त्यांच्या पत गुणवत्तेला कोणताही धोका निर्माण करण्याइतकी जास्त नाहीत', असं जगातील आघाडीच्या रेटिंग एजन्सी फिच आणि मूडीज यांनी मंगळवारी सांगितले. त्यामुळे आता अदानी समुहाने पुन्हा कमबॅक केल्याचे चित्र शेअर बाजारात आहे.
हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रूपला धक्का
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप करत सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानंतर अदानी ग्रूपच्या कंपन्यांचे शेअर्स जोरदार आपटले. अदानींना इतका तोटा सहन करावा लागला की ते जगातील श्रीमंतांच्या यादीतून टॉप-२० मधूनही बाहेर फेकले गेले. अदानी एन्टरप्रायजेसचा एक शेअर हिंडनबर्गर अहवालाच्या आधी ३,८०० रुपये इतका होता. अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर शेअरमध्ये घसरण होण्यास सुरुवात झाली आणि ३ फेब्रुवारीला एका शेअरची किंमत १०९५ रुपयांवर येऊन पोहोचली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"