Adani Power Share Target: जर तुम्ही अदानी समूहाच्या कंपनीतील शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. बाजार विश्लेषकांनी अदानी पॉवरचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अदानी पॉवरचा शेअर बुधवारी १ टक्क्यांहून अधिक घसरणीसह ५०८ रुपयांवर बंद झाला. महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी शेअर बाजारातील व्यवहार बंद आहेत.
टार्गेट प्राइस काय?
व्हेंचुरा सिक्युरिटीजनं अदानी पॉवरच्या शेअरवर ८०६ रुपयांचे टार्गेट प्राइस ठेवलंय. म्हणजेच अदानी समूहाचा शेअर आधीच्या बंद किमतीपेक्षा ५९ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये अदानी पॉवरच्या महसुलात २९.९ टक्के आणि एबिटा (व्याज, कर, अवमूल्यन आणि अमोर्टायझेशनपूर्वीचे उत्पन्न) ८१ टक्क्यांनी वाढलंय. आर्थिक वर्ष २०३१ पर्यंत आपली क्षमता ३०.६७ गिगावॅटपर्यंत वाढविण्याचे कंपनीचं उद्दिष्ट आहे. आर्थिक वर्ष २०२४ ते २७ मध्ये महसूल आणि एबिटडा अनुक्रमे ११.८ टक्के आणि १०.६ टक्के सीएजीआरनं वाढण्याची अपेक्षा आहे.
डिसेंबर तिमाही निकाल
डिसेंबर तिमाहीत अदानी पॉवरचा एकत्रित निव्वळ नफा ७ टक्क्यांनी वाढून २,९४० कोटी रुपये झाला आहे. महसुलात झालेली वाढ प्रामुख्यानं वाढलेल्या वीज विक्रीमुळे झाली आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत एकत्रित एकूण महसूल ११ टक्क्यांनी वाढून १४,८३३ कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत १३,३५५ कोटी रुपये होता. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत निव्वळ नफा ७ टक्क्यांनी वाढून २,९४० कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत २,७३८ कोटी रुपये होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)